अडिच वर्षातील महायुतीच्या कामाची ही पोचपावती - दैदिप्यमान विजयानंतर एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य...

23 Nov 2024 20:26:50
Eknath Shinde

ठाणे : अडिच वर्षात महायुती ( Mahayuti ) सरकारने जे काम केले त्याची पोचपावती जनतेने दिली आहे. तेव्हा, पुढील काळात देखील जनतेप्रती बांधील आहोत. कोपरी पाचपाखाडी मतदार संघातुन १ लाख २० हजारांचे मताधिक्याने चौथ्यांदा दैदीप्यमान विजय मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले.

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ठाण्याच्या कोपरी - पाचपाखाडी मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उबाठा गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उभे केले होते. सलग तीनवेळा वाढत्या मताधिक्यांनी निवडुन आलेल्या एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी हा अभेद्य गड बनला होता. झपाट्याने विकासाकडे झेपावणाऱ्या या मतदारसंघात क्लस्टरच्या माध्यमातून पुर्नविकास तसेच आरोग्य सुविधांसह अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यातच लाडकी बहिण योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचल्याने याचा लाभ महायुतीला होऊन कोपरी पाचपाखाडी मतदार संघात एकनाथ शिंदे यांना एकुण १ लाख ५९ हजार ०६० मते मिळुन १ लाख २० हजार ७१७ च्या मताधिक्य मिळवून विजय संपादन केला. विजयी आगेकूच केल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, भावांनी, शेतकऱ्यानी समाजातील प्रत्येक घटकाने मतदान केल्याने मोठ्या मताधिक्याने महायुतीला दैदिप्यमान विजय मिळाला. त्याबद्द्ल महाराष्ट्रातील जनतेला शिंदे यांनी धन्यवाद दिले. महाराष्ट्रात आमचे कामच बोलत आहे, गेल्या अडिच वर्षात महायूतीने जे काम केले त्याचीच ही पोचपावती जनतेने दिली असल्याचे सांगून पुढील काळात देखील जनतेप्रती बांधील असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जल्लोष

राज्यात महायुतीच्या महाविजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा एकच जल्लोष केला. यावेळी खासदार शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून विजयाचा जल्लोष केला. हा विजय महायुतीने गेल्या दोन वर्षात घेतलेले अनेक निर्णय आणि लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अभियान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या अथक मेहनतीचा विजय असल्याचे खा. शिंदे म्हणाले.

Powered By Sangraha 9.0