मुंबई : राज्यात महायुतीला लाडक्या बहिणींनी ओवाळणी म्हणून विजयाची माळ गळ्यात टाकली आहे. महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. महायुती २८८ जागांपैकी २२४ जागांवर महायुतीला कौल मिळाला आहे. महायुतीच्या ( Mahayuti ) दिग्गज उमेदवारांना लाडक्या बहिणींचा आशीवार्द मिळाला आहे. तेच दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीचा खेळ केवळ ५४ जागांवर आटोपला आहे. इतर आणि अपक्ष मिळून १० जागा आहेत. बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मतदान झाले असून शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली.
महायुती व महाविकास आघाडी मधील चुरशीची लढाई आता एकतर्फी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील एकूण मतदान ६६ टक्क्यांनी झाले होते. महायुती सरकारने यशस्वीपणे राबवलेल्या नवनवीन योजनांचा योग्यरित्या लाभ मिळाल्यामुळे जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूला झुकत असलेला आपल्याला दिसून येत आहे. या योजनांतील "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना ही खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरली. या योजनेमध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारकडून मदत करण्यात आली.
या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात आला. या योजनेत जुलै'२४ आणि ऑगस्ट'२४ अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख महिलांना ४,७८८ कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. सरकारच्या या योजनेमुळे महिला वर्गाला मोठा हातभार लागलेला दिसून येतो. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला विजयाची ओवाळणी दिली आहे. महायुतीने हा लाभ आता २१०० रुपये करणार असल्याचे जाहीर केले होते.