ठाकरेंची मुंबईवर पकड सैल

23 Nov 2024 23:07:44

Uddhav Thackeray
 
 
विधानसभा निवडणुकीनंतर उरलेसुरले शिवसैनिकही दुरावल्याचे चित्र आहे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता, मुंबईत त्याची धग सर्वाधिक जाणवते.
 
‘असंगाशी संग प्राणांशी गाठ’ अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाची झालेली दशा पाहून या म्हणीचीआठवण व्हावी. वाईट लोकांच्या सान्निध्यात राहिले, तर नुकसान होतेच, प्रसंगी जीवही गमावावा लागू शकतो, असा या म्हणीचा गर्भितार्थ. काँग्रेस, पवारांसारखे अनैसर्गिक मित्र जोडून ठाकरेंनी असंगाशी संग केला आणि राजकीय विजनवास पदरात पाडून घेतला. ना पक्ष राहिला, ना चिन्ह; आता विधानसभा निवडणुकीनंतर उरलेसुरले शिवसैनिकही दुरावल्याचे चित्र आहे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता, मुंबईत त्याची धग सर्वाधिक जाणवते.
 
शिवसेना फुटीनंतर मुंबईतील बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे मुंबई उबाठाचीच असल्याचा प्रचार लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धवरावांनी सर्वाधिक 21 जागा हट्टाने मागून घेतल्या. त्यातील 18 जागांवर हमखास विजय मिळेल, असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. सोशल मीडिया आणि मविआप्रणित माध्यमांमध्ये तशी हवादेखील केली जात होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा सुपडा साफ होणार, अशाही चर्चा सुरू होत्या. प्रत्यक्षात घडले उलटेच! शिंदेंसोबत गेलेले पाचपैकी दोन उमेदवार पराभूत झाले असले, तरी अधिकच्या तीन जागा निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले. सदा सरवणकर आणि यामिनी जाधव यांचा पराभव झाला, तर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, तुकाराम काते, अशोक पाटील, मुरजी पटेल असे शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले. त्यांनी या निवडणुकीत 15 जागा लढवल्या होत्या.
 
राजधानी मुंबईत भाजपचा ‘स्ट्राईक रेट’ सर्वाधिक राहिला. भाजपने 17 जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी 15 जागांवर त्यांना यश मिळाले. वर्सोव्यात भारती लव्हेकर आणि मालाड पश्चिमेला विनोद शेलार यांचा पराभव झाला. अन्य ठिकाणांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. लोकसभेला हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी अधिकची मते घेऊन उबाठाचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचे बिंग फुटले. लोकसभेला मविआला 43.09 टक्के, तर महायुतीला 43.06 टक्के मते मिळाली. तरीही त्यांना 31 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या. मुंबईचा विचार केला, तर महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत 24 लाख आणि महायुतीला 26 लाख मते मिळाली. भाजपने ही बाब हेरत अचूक गणितीय मांडणी केली आणि 17 पैकी 15 जागा जिंकल्या.
 
लोकसभेला भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार, हा विषय इतका खालपर्यंत गेला, की त्याचा परिणाम निकालावर झाला. बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात झाला. परंतु, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला ‘ब्रेक ’लावण्यात भाजपला मोठे यश मिळाले. महाराष्ट्रातील उद्योग पळवले, हाही ‘नॅरेटिव्ह’ तयार केला गेला. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मुद्देसूदपणेत्यांचा अपप्रचार खोडून काढला.
 
कोरोना काळातील मविआच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पटवून देण्यात भाजपचे धुरिण यशस्वी ठरले. कोरोनाकाळात मुंबईत प्राणवायूअभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. पालिकेतील सत्ताधार्‍यांच्या कमिशनखोरीमुळे रुग्णांचे हाल हाल झाले. रस्ते, गटार, नालेसफाईच्या निविदांमधून यांनी कोट्यवधी रुपये कमावलेच. पण, कोरोनाबळी ठरलेल्या मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यापर्यंत यांची मजल गेली. 250 रुपयांची बॉडीबॅग (शवपिशवी) तब्बल 6 हजार, 719 रुपयांना खरेदी करीत, पालिकेतील तत्कालीन सत्ताधार्‍यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केला आणि त्या पैशांतून बंगले बांधले. त्यामुळे अशा भ्रष्टाचार्‍यांना धडा शिकवण्यासाठी मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.
 
भाजप-महायुतीने मुंबईत उभारलेले पायाभूत सुविधांचे जाळे, अटल सेतू, कोस्टल रोड, भूमिगत मेट्रो, उपनगरीय रेल्वेसुविधांमध्ये दर्जात्मक वाढ अशा विविध मुद्द्यांना मतदारांनी कौल दिला. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक हैं तो सेफ हैं’ या नार्‍यामुळे हिंदू समाज जागृत होऊन मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचे तुष्टीकरणाचे प्रयत्न फसले. लाडक्या बहिणींनीही स्वतःहून फडणवीस-शिंदे आणि अजित पवारांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे महायुतीला मुंबईतील 36 पैकी तब्बल 22 जागांवर यश मिळाले.
 
सात जागांवर निसटता विजय
 
उबाठा गटाच्या नावापुढे मुंबईतील दहा जागा दिसत असल्या, तरी त्यातील सात जागांवर निसटता विजय मिळाला आहे. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत या जागांवरील लढत अटीतटीची राहिली. माहीममध्ये शेवटच्या फेरीत केवळ 1 हजार, 300 मतांच्या फरकाने महेश सावंत विजयी झाले. जोगेश्वरीत 1 हजार, 500 मतांनी शिवसेनेच्या मनिषा वायकर पराभूत झाल्या. वर्सोव्यात भारती लव्हेकर यांना 1 हजार, 600 मतांची पिछाडी मिळाली. शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी कडवी झुंज दिली. पण, उबाठाचे अजय चौधरी केवळ चार हजार मतांनी जिंकले. कलिनामध्ये रिपाइंचे अमरजितसिंह ठाकूर शेवटपर्यंत आघाडीवर होते. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दिंडोशीतही शिवसेनेच्या संजय निरुपम यांनी उबाठाच्या सुनिल प्रभू यांना घाम फोडला. वरळीत आदित्य ठाकरे पराभूत होता होता थोडक्यात बचावले. तसेच मानखुर्दमधून नवाब मलिक पराभूत झाले, तर त्यांची कन्या सना मलिकने मात्र अणुशक्तीनगर मतदारसंघातून विजयी गुलाल उधळला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीचे कल पाहता, महायुतीला घवघवीत यश मिळेल, असेच चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0