हा निकाल आम्हाला मान्य नाही! ही निवडणूक मॅनेज केली आहे : संजय राऊत

23 Nov 2024 10:57:27
 
Sanjay Raut
 
मुंबई : राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून महायूतीने २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी मात्र, ५१ जागांवर पिछाडीवर आहे. दरम्यान, हा निकाल आम्हाला मान्य नाही. ही निवडणूक मॅनेज केली आहे, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.
 
संजय राऊत म्हणाले की, "कुछ तो गडबड है. एकनाथ शिंदेंना ५६ जागा कशाच्या भरवशावर मिळत आहेत? अजित पवारांना ४० च्या वर जागा मिळताहेत. मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी इथे असे काय दिवे लावलेत की, त्यांना १२० च्या वर जागा मिळताहेत? आम्ही ग्राऊंडवर फिरलो असून महाराष्ट्रातील वातावरण आणि कल पाहिला होता. आम्ही लोकशाहीचा कौल मानतो पण हा कौल कसा मानावा, असा प्रश्न राज्यातील जनतेलासुद्धा पडला असेल."
 
"शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना १० जागासुद्धा द्यायला तयार नाहीत. हे महाराष्ट्रात शक्य आहे का? त्यामुळे ही काय गडबड आहे हे सगळ्यांना कळेल. हा निकाल जनतेचा कौल आहे, असे मानायला आम्ही तयार नाही. जनतेचा कौल हा नव्हता. निवडणूकीत जय-पराजय होत असतात. पण जे निकाल लावून घेतलेले आहेत त्यावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही. काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे," असे ते म्हणाले.
 
निकालावर अदानींचा प्रभाव!
 
संजय राऊत पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रावर अदानींचे बारीक लक्ष होते. काल गौतम अदानींचे अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का, अशी आमच्या मनात शंका होती. गौतम अदानींवरील भ्रष्टाचाराचे आरोप हे अप्रत्यक्षपणे भाजपवरच होते. या निवडणूकीत सर्वात जास्त पैशाचा वापर आणि ताकद अदानींनी लावली. त्यामुळे या निकालावर त्यांचा प्रभाव आहे का? या निवडणूकीत पैशांचा वापर झाला आहे. एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात? अजित पवारांच्या गद्दारीविरुद्ध या महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला. पण ते वादळ तुम्हाला दिसत नाही आणि आज जागा जिंकल्यावर यूतीचं वादळ म्हणत आहेत."
 
लोकसभेच्या निकालातही गडबड!
 
"लोकसभेच्या निकालातही गडबड झाली असे आम्ही म्हणतो. अन्यथा नरेंद्र मोदींचा पराभव झाला असता. आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला. यावेळी खूप मोठे कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला कौल नाही. आमच्या महाविकास आघाडीला ७५ जागाही तुम्ही देत नसाल तर अमित शाह, मोदी आणि अदानींनी ठरवून हा निकाल लावला आहे," असेही राऊत म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0