मुंबई : विदर्भाचा निकाल म्हणजे सत्तेच्या जवळ घेऊन जाणारा असतो यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभा निवडणूकीत महायूतीला अभूतपूर्व यश मिळाले असून या यशात विदर्भाचा मोठा वाटा आहे. विदर्भात महायूतीला ६२ पैकी ४८ जागा मिळाल्या आहेत.
विदर्भ हा राज्यातील सर्वात जास्त मतदारसंघ असलेला विभाग आहे. त्यामुळे विदर्भाच्या निकालाकडे कायमच सर्वांचे लक्ष लागून असते. शिवाय भाजप आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेदेखील विदर्भातीलच असल्याने सर्वच पक्ष इथे जास्त ताकद लावत असतात. दरम्यान, यावेळी विदर्भात भाजपने मुसंडी घेतली असून सर्वाधिक ३८ जागांवर विजय मिळवला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीला मात्र, विदर्भात अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषत: शरद पवार गटाला तर विदर्भात खातेही उघडता आले नाही. अनिल देशमुखांसारख्या बड्या नेत्याचा बालेकिल्ला भाजपने आपल्याकडे खेचून घेतला आहे.
पक्ष लढलेल्या जागा विजयी जागा
भाजप ४७ ३८
शिवसेना (शिंदे) ९ ४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ८ ६
काँग्रेस ४० ९
शिवसेना (उद्धव ठाकरे) ९ ४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १३ ०
अन्य १