जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : देवेंद्र फडणवीस
महायूतीची संयुक्त पत्रकार परिषद
23-Nov-2024
Total Views |
मुंबई : जनतेने दाखवलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. विधानसभा निवडणूकीत महायूतीने २३१ जागांवर अभूतपूर्व विजय मिळवला आहे. दरम्यान, शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि फडणवीसांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात खूप काम करावे लागेल, याची जाणीव होत आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही."
लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला!
एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक दिवस आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणूका पाहिल्या. पण ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली, अशी होती. लोकांनी महायूतीवर मतांचा आणि प्रेमाचा वर्षाव केला. सर्वच घटकातील लोकांनी महायूतीवर प्रेम दाखवले. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. गेल्या दोन वर्षात आम्ही घेतलेले निर्णय हे आतापर्यंतच्या इतिहासातील न भूतो न भविष्यते असे होते. महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेली सगळी कामे आम्ही सुरु केली. राज्याचा सर्वांगिण विकास हाच आमच्या डोळ्यासमोर होता. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला. राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचे उद्दिष्ट होते. त्यासाठी केंद्र सरकारदेखील आमच्या पाठीमागे ताकदीने उभे होते."
"लोकांनी कल्याणाचे आणि विकासाचे राजकारण स्विकारले आणि सुडाचे, आरोपाचे आणि द्वेषाचे राजकारण झिडकारले. लोकसभेतसुद्धा विरोधकांनी फेक नरेटिव्ह तयार करून जातीजातींमध्ये भीती निर्माण केली. तरीसुद्धा प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसलेत. आमचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकार पडणार एवढे एकच ते बोलत होते. पण आम्ही त्यांना आरोपांनी उत्तर न देता कामातून दिले. हे काम लोकांना भावले. २०१९ ला जे सरकार स्थापन व्हायला हवे होते ते झाले नाही. लोकांनी हे बरोबर लक्षात ठेवले आहे. त्यामुळे या निवडणूकीत लोकांनी कोणता पक्ष कुणाचा हे ठरवले आहे. आता बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. मोदीजींनी विकासासाठी एकत्र येण्याचे आव्हान केले. पण लोकांनी त्याचा वेगवेगळा अर्थ काढला. लोकांनी एकत्र येऊन एकजूटीचे दर्शन या निवडणूकीत घडवले आणि मतदानाची टक्केवारी वाढली. लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगलाच जोडा दाखवला आहे," अशी टीका त्यांनी केली.
या यशाने आम्ही हुरळून जाणार नाही!
अजित पवार म्हणाले की, "काल प्रत्येकजण आपापल्या परीने अंदाज व्यक्त करत होते. सुरुवातीला आम्ही खाली जातो की, काय असे वाटत होते. परंतू, महाराष्ट्रातील जनतेने विकासाकडे बघून महायूतीला प्रचंड यश प्राप्त करून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. सगळे कार्यकर्ते, उमेदवार, सहकारी या सर्वांनी स्वत:ला झोकून दिले आणि ही निवडणूक स्वत:ची समजून कामाला लागले. आमच्या योजनांबद्दल बरीच चेष्टा-मस्करी करण्यात आली. टीका करण्यात आली. परंतू, नंतर कुठलाही हिशोब न ठेवता त्यांचेच जाहीरनामे बाहेर आलेत. लोकसभा निवडणूकीत आम्हाला मोठे अपयश आले. पण आम्ही ते मान्य केले आणि त्यातून पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. आम्ही जाहीर केलेल्या योजना प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्यातील लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढली आहे. महाराष्ट्रात कुठल्याही आघाडीला किंवा यूतीला एवढे प्रचंड बहुमत मिळाल्याचे मी आजपर्यंत पाहिले नाही. परंतू, या यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. महाराष्ट्रातील सर्वच प्रभागांमध्ये महायूतीला चांगले यश मिळाले आहे. आमच्या महायूतीची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे अधिक बारकाईने काम करावे लागेल. आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही."