"ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा; अन्यथा..."

22 Nov 2024 16:06:14

Hindu Janajagruti Samiti

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (demand to arrest Dnyanesh Maharao) 
कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोलापूर न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून दोन महिने उलटले असतानाही त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यामुले पोलीस प्रशासनाने ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करू असा इशारा ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट’ आणि ‘हिंदू जनजागृती समिती’ने दिला आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ आणि ३०२ अन्वये ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यात सोलापूर न्यायालयानेही जामीन नाकारला. गुन्ह्याला दोन महिने उलटले तरी कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कारवाईला दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही याद्वारे करण्यात आली आहे. हिंदू सहिष्णू आहेत आणि कायदेशीर प्रक्रियेवर त्यांचा विश्वास आहे; त्यामुळे न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यांच्या भावना दुखावणाऱ्यांना अटक होत नाही, हे अनाकलनीय आणि संतापजनक आहे. ही घटना दुसऱ्या धर्माबाबत घडली असती तर पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करून तुरुंगात टाकले असते, असे हिंदु जनजागृती समितीने निवेदनात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0