निवडणुकीतल्या रिंगणातले साहित्यिक

22 Nov 2024 23:04:55

elections
 
संपूर्ण महाराष्ट्राला आजच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे वेध लागले आहेत. आजचा हा मुहूर्त साधून ‘निवडणुकांच्या रिंगणातले साहित्यिक’ असा धांडोळा घेण्याचे ठरले. कारण, मराठी साहित्यिकांनी ‘राजकारण’ या विषयाला लेखणीतून स्थान दिलेच, पण काही साहित्यिकांनी प्रत्यक्ष राजकीय विश्वात देखील आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. अशाच काही राजकारणात नशीब आजमावणार्‍या साहित्यिकांविषयी...
 
राजकारणाच्या रिंगणात उतरलेल्या मराठी साहित्यिकांचा विचार करताना एक नाव सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आचार्य अत्रे महाराष्ट्राला सुपरिचित. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळेच साहित्यासोबतच राजकारणातसुद्धा त्यांनी आपला विशेष ठसा उमटवला. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळी’त मोलाचे योगदान देणार्‍या आणि आपल्या झुंजार लेखणीतून वैचारिक क्रांती घडवून आणणार्‍या आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा क्रांती घडवण्याचा विचार केला नसता, तरच नवल! आचार्य अत्रे यांनी अगदी विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचा अनुभव घेतला होता. १९६२ साली ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’तर्फे आचार्य अत्रे यांनी एकाचवेळी मुंबईतील दादर मतदारसंघातून विधानसभेची आणि पुणे शहरातून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. दादर मतदारसंघातून विधानसभेवर, तर अत्रे विजयी झाले, पण लोकसभेत मात्र त्यांना परभवाला सामोरे जावे लागले. १९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आचार्य अत्रे खचून गेले नाहीत, तर उलट तो पराभव खोडून काढण्यासाठी १९७६ साली पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. पण, त्या निवडणुकीतसुद्धा त्यांना काही मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
 
अत्रेंसारखाच ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ यांसारख्या काव्यपंक्ती लिहून वाचकांच्या मनात अजरामर झालेले आणि ‘गझल’ या काव्यप्रकाराला मराठीत लोकप्रियता मिळवून देऊन ‘गझलसम्राट’ म्हणून नावारुपास आलेले सुरेश भट यांनीसुद्धा निवडणुकांच्या रिंगणात आपला सूर शोधण्याचा प्रयत्न केला. भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून पश्चिम नागपूर मतदारसंघातून सुरेश भट यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.
वर्‍हाडी साहित्यातील एक मोठे नाव म्हणजे डॉ. विठ्ठल वाघ. आपल्या साहित्यातून शेती, शेतकरी, माती, ग्रामीण जीवन यांचे चित्र रेखाटून विठ्ठल वाघ यांनी मराठी वाचकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. त्यांच्या ‘काळ्या मातीत मातीत, तिफण चालते’ या कवितेने तर चित्रपट गीताचे रुप घेऊन, प्रत्येक मराठी माणसाला आपली दखल घ्यायला भाग पाडले. डॉ. विठ्ठल वाघ यांनी ‘राजकारण’ या विषयावर बरेच लिखाणही केले आणि अनेक राजकारण्यांवर त्यांनी आपल्या लिखाणातून टीकासुद्धा केली. ‘आम्ही मेंढरं... मेंढरं यावं त्यानं हाकलावं, पाचा वर्साच्या बोलीनं व्हतो आमुचा लिलाव’ अशा ओळी लिहून मतदारांना जागृत करण्यासोबतच त्यांनी स्वतः निवडणुकीत सहभागसुद्धा घेतला होता. १९९७-९८ मध्ये डॉ. विठ्ठल वाघ यांनी अकोला येथून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती; पण त्यांच्याही पदरी अपयशच आले. याशिवाय, कवी यशवंत मनोहर यांनी २००९ साली भारतीय रिपब्लिकन पार्टीकडून २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याच वर्षी कवी ज्ञानेश वाकुडकर यांनीही राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
 
महाराष्ट्राच्या राजकारणाचा आतापर्यंत विचार केला, तर अनेक मराठी साहित्यिकांनी राज्याच्या विविध विभागांतून निवडणुकांमध्ये आपले नशीब आजमावले. पण, त्यांपैकी अपेक्षित असे यश कोणालाच मिळालेले दिसत नाही. एका साहित्यिकाला साहित्यविश्वात जितके प्रेम मिळते, तितके ते एक राजकीय उमेदवार म्हणून मतदारांकडून मिळतेच असे नाही. प्रसंगी त्यांनी राजकारणात प्रवेश केला, म्हणून त्यांना लोकांचा रोषच ओढवून घ्यावा लागतो, हेच आजरवरच्या काही उदाहरणांमधून दिसून आलेले आहे.
 
प्रसिद्ध साहित्यिक आणि ‘८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षस्थान भूषविणारे फ. मुं. शिंदे यांनासुद्धा अशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जावे लागले होते. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’सोबतच इतरही अनेक साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान फ. मुं. शिंदे यांना मिळाला. पण, राजकीय खुर्चीवर बसण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही. हिंगोली जिल्ह्यातील कळंब मतदारसंघातून फ. मुं. शिंदे यांनी जनता दलाकडून निवडणूक लढवली होती, पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्या निवडणुकीनंतर एका कार्यक्रमात भावना व्यक्त करताना फ. मु, शिंदे यांनी साहित्यिक जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात, याविषयी भाष्य केले होते. ते म्हणाले, होते, “त्यावेळी इतर उमेदवारांचे जे झाले, तेच माझे कळंबमध्ये झाले. तुम्ही लोकप्रिय कवी असताना राजकारणात कशाला आलात? अशी विचारणा अनेकांनी केली. पण, निवडणुकीत लढल्याशिवाय आणि पडल्याशिवाय आपण किती ‘लोकप्रिय’ आहोत, हे कळत नाही.” खुद्द शिंदे यांनीच सांगितलेला हा अनुभव जरी त्यांचा वैयक्तिक असला, तरीही इतर साहित्यिकांनाही निवडणूक लढवताना कमी-अधिक प्रमाणात अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागलेच असणार, यात काही शंका नाही.
 
महाराष्ट्राचे आजवरचे चित्र पाहता, साहित्यिकांनी राजकारणात उतरणे किंवा निवडणूक लढविणे, ही बाब लोकांना फारशी रुचत नाही, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. साहित्यिकांनी राजकारणावर भरभरून बोलावे, लिहावे आणि टीकाही करावी. पण, त्यांनी प्रत्यक्ष राजकारण करू नये, अशीच कदाचित लोकांची इच्छा असावी. त्यामुळेच साहित्यिकांच्या प्रत्येक शब्दावर भरभरून प्रेम करणार्‍या त्यांच्या वाचकांनी ते प्रेम आजवर भरघोस मते देऊन व्यक्त केलेले नाही.
 
तसेच राजकीय क्षेत्रातही मूळ पिंड राजकारणाचा असणारे अनेक साहित्यिक आहेत, पण साहित्यिक असून राजकारणात सक्रिय असणारी नावे तर आताच्या काळातही नाममात्रच! साहित्य-कलावंत प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत आमदार म्हणून नियुक्त झालेल्या साहित्यिकांमध्ये ग. दि. माडगूळकर आणि ना. धो. महानोर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. पण, प्रत्यक्ष निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने साहित्यिकांना कौल दिल्याचे प्रसंग विरळेच. खरं तर राजकारण आणि साहित्य हे दोन्ही विषय थोडक्यात मांडणे अशक्यच. पण, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांच्या निमित्ताने केलेला हा अल्पसा प्रयत्न...
 
दिपाली कानसे 
Powered By Sangraha 9.0