दुर्लक्षित समाजाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलणारा 'छबिला'

22 Nov 2024 23:29:32
 
Chhabila
 
शिक्षणामुळे एखाद्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण, तो बिघडूही शकतो, याचं उत्तम सादरीकरण करणारा चित्रपट म्हणजे ‘छबिला’. अनिल भालेराव दिग्दर्शित आणि लिखित ‘छबिला’ हा चित्रपट 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘इफ्फी’च्या ‘फिल्म बाजार’ या विभागात लक्षवेधी ठरला. ‘लमाण’ या समाजाविषयी फारशी लोकांना माहिती नसेल. खाणीतील दगड फोडून आपला उदरनिर्वाह करणारा अगदी अल्पसंख्याक असा हा लमाण समाज. शिकल्या-सवरलेल्या समाजाने त्यांना कायमच दूर ठेवल्यामुळे त्यांच्या मानसिक, आर्थिक, शारीरिक अडचणी कोणी जाणून घेतल्या नाहीत. मात्र, ‘छबिला’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अनिल यांनी मनाला चटका लावणारी कथा प्रेक्षकांसमोर आणून समाजाचे डोळे उघडण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. त्याविषयी...
 
बिला’ या शब्दाचा मुळात अर्थ दगडफुल. दगडात येणार्‍या फुलाचं जसं इतरांच्या मते काहीही अस्तित्व आणि महत्त्व नसतं, तसंच काहीसं लमाण या समाजाचं. चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, दहा-बाराजणांची एक टोळी नाशिकमधील एका खाणीत आपल्या कुटुंबासह दगड फोडण्याचं काम करत असते. आठवड्याची मिळणारी मजुरी आणि त्यातून गावात जाणून खरेदी केलेला बाजार यातच त्यांच्या जेवणाची सोय होते. पण, त्यांच्या समूहातील एक कुटुंब आपल्या मुलाला गण्याला शाळेत पाठवते. त्याच्या आईला आपल्या मुलाने त्याने शिकून मोठा अधिकारी व्हावं, अशी मनोमन इच्छा असते आणि त्यामुळे समाजाच्या विरोधात जात ती गण्याला शिकवण्याचा निर्णय घेते. परंतु, समाजातील विभक्त केलेल्या या जातीतील लोकांचं जगणं फार कठीण असतं आणि त्यांना रोजचे जीवन जगण्यासाठी किती कष्ट सोसावे लागतात, याची हृदय पिळवटून टाकणारी कथा म्हणजे ‘छबिला’.
 
मुळात एखाद्या समाजातील आर्थिक, बौद्धिक, वैचारिक अडचणी मांडणं काहीसं जोखमीचं काम. मात्र, दिग्दर्शक आणि लेखक अनिल भालेराव यांनी हे शिवधनुष्य अतिशय उत्तमरित्या हाताळले आहे. आपल्या समाजाला किंवा आपल्या जातीला शिकलेल्या लोकांच्यामते काहीच किंमत नाही, याची वारंवार जाणीव स्वतःलाच हा समाज किंवा त्या समाजातील लोक कशी करून देत असतात, ते बर्‍याच प्रसंगांतून चित्रपटात मांडण्याचा उत्कृष्ट प्रयत्न भालेराव यांनी केला आहे.
 
चित्रपटात एक प्रसंग येतो, जिथे शाळेला जाणारा त्या समाजातील मुलगा त्याच्या वर्गातील मित्राला त्याला जातीवरून हिणवल्यामुळे कानशिलात लगावतो आणि त्याचा राग काढण्यासाठी तो मुलगा आपल्या भावाला घेऊन खाणीच्या जवळ भकास डोंगराच्या कडेला वस्ती करून राहिलेल्या गण्याच्या घरी येतो. रागात तो गण्याच्या आणि त्याच्या व़डिलांच्या कानाखाली मारतो आणि त्यांना अगदी गलिच्छ भाषेत बोलून निघून जातो. पण, त्यावेळी तिथे त्यांच्या समाजातील इतर लोक केवळ निमुटपणे सगळं ऐकून घेतात. यावरून दिग्दर्शकाला हे सांगायचे आहे की, जरी एकत्रित दहा-बारा माणसे उभी असली, तरी समाजमान्यता नसल्यामुळे त्यांना तीन माणसांच्यापुढेही नमतं घ्यावं लागतं आणि हे सर्वस्वी दुर्दैवीच.
 
असेच चित्रपटात माणूस म्हणून आपल्याला ‘रिऍलिटी चेक’ देणारे अनेक प्रसंग येतात आणि पात्रांच्या तोंडी संवाद नसला, तरी ती शांतता खूप काही सांगून जाते. तसेच, त्यांच्या गरजा, दैनंदिन कामं, कर्जबाजारी असूनही जगण्याचा आनंद शोधण्याचे मार्ग हे सारं काही सुंदर चित्रित केलं आहे. शिक्षणाचे महत्त्व पटवणारे असंख्य चित्रपट आजवर आले. पण, एखादा समाज शिक्षणाकडे का वळत नाही, याचं सखोल कारण सांगणारा ’छबिला’ हा चित्रपट आहे.
 
‘छबिला’ चित्रपटाच्या तांत्रिक बाबी जरी वरकरणी तितक्याशा लक्षवेधी नसल्या, तरी कथानकाची बाजू इतकी उजवी आहे, की जेणेकरून अन्य कोणत्याच त्रुटींकडे लक्ष जात नाही, हे विशेष. चित्रपटात एकही गाणं नाही किंवा पार्श्वसंगीतातही शब्द नाहीत. केवळ प्रसंग, कथा यांना अनुसरूनच समर्पक संगीत काळजाला नक्कीच भिडतं. त्याशिवाय, चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने साकारलेली भूमिका शब्दांत मांडण्यापलीकडे आहे. एकूणच ‘छबिला’ या चित्रपटाचा विषय लमाण या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा आणि माणुसकी जिवंत करणारा आहे.
 
चित्रपट : छबिला
दिग्दर्शक : अनिल भालेराव
कलाकार : स्वाती गोतावले, विनय धाकडे, दिलीप डोंबे, अरुण अमृत
रेटिंग :
Powered By Sangraha 9.0