रम्य या जगी आनंदे रमू सारे!

21 Nov 2024 08:45:23

यजुर्वेद 
 
आपले जीवन सर्वदृष्ट्या रम्य आनंदी व स्वर्गमय बनवायचे असेल, आम्हांला नेहमीच दानशूर बनावे लागेल. मंत्रातील आशय दुःखमय जीवन जगणार्‍या या भूतलावरील सर्वदेशीय माणसाला, निश्चितच सुरम्य बनवेल व तो देशदेखील
रम्य होईल.
 
इह रतिरिह रमध्वमिह
धृतिरिह स्वधृतिः स्वाहा।
उपसृजन् धरुणं मात्रे धरुणो मात्रा धयन्।
रायस्पोषमस्मासु दीधरत् स्वाहा॥
(यजुर्वेद - 8.51)
 
अन्वयार्थ
 
(इह) या जगात (रतिः) सर्वत्र रमणीयता आहे. (इह) इथे (धृतिः) धारणाशक्ती विद्यमान आहे. तसेच (इह) या विश्वात (स्वधृतिः, स्वाःच) आत्मधारणा व यज्ञीय भावनादेखील आहे. (धरुणः) प्रत्येक धारणकर्त्याने (मात्रे) मातृभूमीसाठी (धरुणम् उपसृजन्) धारणाशक्तीला उत्पन्न करीत (मातरं धयन्) या भूमिमातेच्या विविध पदार्थांचे (स्तन)पान करावे. सोबतच (स्वाः) यज्ञभावनेला बाळगत (अस्मासु) आम्हामध्ये (रायः पोषम्) धनाच्या पौष्टिकतेला व तिच्या वाढीला (दधिरत्) धारण करावे.
 
विवेचन
 
परमेश्वराच्या या सृष्टीव्यवस्थेत सर्वत्र रम्यता व मंगलमयता आढळते. त्या ब्रह्माचे विश्वरूप काव्य हे, जे की दृक् व श्रस्व्य स्वरूपात अनुभवास येते, ते खर्‍या अर्थाने सर्वस्वी परिपूर्ण आहे. इथे अपूर्णता अजिबात आढळत नाही. अगदी स्थूलातिस्थूल ते सूक्ष्मातिसूक्ष्म असलेल्या सबंध जड-चेतन वस्तू व प्राणीसमूहामध्ये कुठेही कमतरता भासत नाही. त्याबरोबरच त्याची सृष्टी ही मिथ्यादेखील नाही. जो स्वतः सत्य, शाश्वत व परिपूर्ण असेल, तर मग त्याची सारी सृष्टी कशी काय अपूर्ण व मिथ्या असणार? तसेच, तो ईश्वर सर्वार्थाने तृप्त व पूर्ण आनंदीदेखील आहे, तर त्याची सृष्टी हीसुद्धा संपूर्ण सर्वानंदी व सुखमय असणार, यात शंकाच नाही. नित्यप्रति त्याच्यात रमणीयता ओसंडून वाहत आहे.
 
ही रम्य सृष्टी प्रत्येक जीवाला आनंद प्रदान करणारी आहे. जो परमेश्वर स्वतःच रमणीय, मंगलमय व आनंदस्वरूप आहे, तर मग त्याची सृष्टी का म्हणून रम्य असणार नाही? अशा या रम्यतेची आनंदानुभूती घेणारा मानव हादेखील, तितकाच उत्साही व सुरम्य असावयास हवा! त्याच्या अंतरंगामध्ये भगवंताच्या या दिव्यसृष्टीचा आस्वाद घेण्याची तीव्र इच्छा असावी. यामुळेच तर त्याचे जीवन सफल ठरते. याउलट, ज्याच्या अंतरंगात जर या रमणीयतेला अनुभवण्याची तीव्र इच्छाशक्ती नसेल, तर त्याला या सृष्टीत दुःखच दुःख दृष्टीस पडणार यात शंका नाही. आज माणसाची हीच अवस्था झाली आहे. सर्व काही मिळूनदेखील त्याला समाधान नाही की आनंद! मानवाच्या या नैराश्यवृत्तीला दूर करण्यासाठी, वेदात विविध ठिकाणी उत्साहवर्धक मंत्र आले आहेत. त्यातीलच हा एक
 यजुर्वेदातील मौलिक मंत्र!
 
मंत्राच्या आरंभीच मानवाला या सृष्टी वैभवाचे दिग्दर्शन केले आहे-
 
इह रमध्वम् ..... इह रतिः,
इह धृतिः, इह स्वधृतिः, इह स्वाः!
 
अर्थात हे मानवांनो! या सृष्टीत तुम्ही सदैव रमावे. कारण इथे रति म्हणजेच रम्यता आहे. इथे धारणाशक्ती विद्यमान आहे. या ठिकाणी स्वतःच्या आत्म्याची धारणावती बुद्धी आहे, तर याच सृष्टीत ‘स्वाः’भाव दृष्टीस पडतो.
 
किती सुंदर भाव इथे व्यक्त झाला आहे. या जगात वावरताना आपल्या सभोवताली अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारच्या घटना घडतात. त्यांच्याकडे पाहताना आपण अगदी सकारात्मक असले पाहिजे. अनुकूलता आली की आम्ही आनंदी होतो, तर थोडीही प्रतिकूलता भासली की लगेच नाराज होतो! वेदमंत्राचा आशय आम्हांस उत्साही व्हायला सांगतो .
 
हे मानवांनो! हे सारे जग तुमचे आहे. बुद्धीचे वैभव केवळ तुम्हाला प्रदान केले आहे. त्याला वरदान समजून अगदी आनंदाने या जगात रममाण व्हा. ही वसुंधरा रत्नगर्भा आहे, ती केवळ तुमच्यासाठी! तिचा आस्वाद प्रयत्नपूर्वक घ्यावयास हवा. श्रुतीचा संदेश आहे, ‘वीरभोग्या वसुंधरा!’ म्हणजेच या सार्‍या वसुंधरेचा उपभोग घेण्याचे सामर्थ्य केवळ शूरवीर मानवामध्येच आहे. हे सारे जग केवळ तुम्हांसाठीच आहे. मानवाला सोडून इतर पशु-पक्ष्यांना या धरतीवरील, भौतिक आणि अध्यात्मिक ऐश्वर्याचा उपभोग घेता येत नाही. याचा अधिकारी केवळ मानवच आहे. म्हणून थोड्याशा क्षुल्लक कारणाने कधीही निराश होता कामा नये! आज अनेकजण नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत, स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. हा तर आपल्या मानव देहाचा अपमान आहे. याउलट प्रयत्न व पुरुषार्थ करून, शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या नरशार्दुलांचा तेजोमय जाज्वल्य इतिहास सतत आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहे.
 
म्हणूनच अशा सत्पुरुषांकडून प्रेरणा घेत उत्साहाने जीवन जगावे. उगीच निराशेने या रम्य अशा स्वर्गभूमीला नरकाचे रूप देऊ नये.
 
ही पृथ्वीमाता तर सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे आगर आहे. तिच्यावर वसलेला अथांग सागर आम्हांस विशाल महत्त्वाकांक्षा बाळगण्याची प्रेरणा देतो. भूमीवर उभ्या असलेल्या हरित वनराई, वृक्ष, लता-वेली या आम्हांस, सदाबहार जीवन जगण्यास प्रवृत्त करतात. तिच्यावर वावरणारे सर्व प्रकारचे पशु, जीव,जंतू हे वेगवेगळे जरी असले, तरी सर्वांच्या अंतःकरणात प्रेमाचा सुकाळ आहे. फक्त त्यांच्याशी प्रेमानेच वागण्याचे भान आम्हांस राखावयास हवे.
 
आपले घर व घरातील सदस्य, नातेवाईक, परिसरात वावरणारे शेजारी स्नेही, मित्रजन हे खरेच आपल्या अत्यंत निकटचे आहेत. त्यांच्यावर आपुलकीच्या नात्याने प्रेमाचा वर्षाव करा! गाव असो की शहर इथे राहणारे सर्व तुमचे सोबती आहेत. म्हणून त्यांना आपलेसे करून, त्यांच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करा! जशी दृष्टी तशी सृष्टी या उक्तीप्रमाणे, आपल्या भावनांचा बाजार भरत असतो. मुळात दृष्टीतच दोष असेल, तर त्याला सृष्टीपण तशी दिसणार! आज बहुतांश जगाची अवस्था हीच झाली आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राच्या प्रगतीत केवळ नकारात्मक विचार व मनातील दुर्भावना याच अडसर ठरत आहेत. यास्तव या जगाकडे पाहताना, आपला सकारात्मक दृष्टिकोन हवा. अशा अनुकूलतेमुळे या रम्य जगाची आपणास तितक्याच आनंदाने अनुभूती घेता येईल.
 
ही रमणीत येण्यासाठी प्रत्येकाच्या अंतःकरणात धृती म्हणजेच धारणाशक्ती किंवा धैर्यशक्ती हवी!
 
जे जे सत्य व योग्य आहे, त्यांना जीवनात धारण करावे. यासाठी प्रयत्नपूर्वक धैर्यशील वृत्ती अंगीकारावी. तसेच सत्यग्रहणासाठी स्वधृती म्हणजेच, आत्म्यामध्येही प्रबळता असावयास असावी. कारण जो आत्म्याने बलवान असतो, तोच सर्वार्थाने जीवनात यशस्वी ठरू शकतो. स्वा म्हणजे दातृत्वाची भावना! जे जे सद्गुण, सद्विचार, उत्तम धन व सर्वश्रेष्ठ बाबी आपल्यामध्ये असतील, त्या इतरांना देण्याचा प्रयत्न करावा. मंत्रात पुढे म्हटले आहे.
 
धरुणः मात्रे धरुणम् उपसृजन् मातरं धयन्!
 
म्हणजेच सद्गुणांना जीवनात अंगीकारणार्‍या धारणकर्त्या मानवाने, आपल्या मातृभूमीसाठी आपल्यातील धारणाशक्तीला वृद्धिंगत करावे. तसेच याच मातृभूमीच्या रम्य अशा कुशीमध्ये विचरण करीत, संपूर्ण विश्वात रम्यमय वातावरण निर्माण करावे.
 
इथे मानवाला धरुणः: म्हटले आहे. सर्वश्रेष्ठ मानव तोच समजला जातो, जो उत्तमोत्तम गुण व पवित्रतम शील धारण करणारा असतो. अशा पवित्र गोष्टींना धारण करणार्‍या माणसाने, केवळ स्वतःपुरतेच रम्यमय जीवन जगण्यापेक्षा आपल्या मातृभूमीचीदेखील काळजी घ्यावी. ज्या भूमीमातेने आमचे संगोपन केले व जिच्यावर आम्ही रमतो, त्या मातृभूमीविषयी आम्ही कधीही कृतघ्नता बाळगता कामा नये. ज्याच्याकडून जे शक्य आहे, त्या पद्धतीने त्याने या भूमीमातेची सेवा करावयास हवी. अगदी कृतज्ञतेने या जन्मभूमीची यथाशक्ती सेवा करणे हे आपले आपले आद्यकर्तव्य आहे. मंत्राच्या शेवटी म्हटले आहे.
 
स्वाः अस्मासु रायः पोषम् दीधरत्!
 
म्हणजेच यज्ञभावनेसह आमच्यामध्ये सर्व प्रकारच्या धनाची वाढ होत राहो. स्वा म्हणजेच त्याग, समर्पण व दातृत्वाची भावना! यज्ञात आहुती प्रदान करताना, मंत्राच्या शेवटी स्वाहाकार उच्चारला जातो. हा स्वाहाकार उद्घोष मानवास निःस्वार्थभाव शिकवतो. जो नेहमी आपल्याजवळील धन, विद्या, वस्तू व पदार्थांचे इतरांना दान करतो, तो कधीच दरिद्री होत नाही. धन दिल्याने संपत नाही, तर ते वाढतच जाते! ज्याच्याकडे जितका उदारभाव, तितकाच तो सुखी, समाधानी व आनंदी! आम्हांस आपल्या धनेश्वर्यात वृद्धी करायची असेल, तर स्वाहाभाव जीवनात अंगीकारावयास हवा.
 
आपले जीवन सर्वदृष्ट्या रम्य आनंदी व स्वर्गमय बनवायचे असेल, आम्हांला नेहमीच दानशूर बनावे लागेल. मंत्रातील आशय दुःखमय जीवन जगणार्‍या या भूतलावरील सर्वदेशीय माणसाला, निश्चितच सुरम्य बनवेल व तो देशदेखील
रम्य होईल.
 प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
Powered By Sangraha 9.0