मृत्यूचे रहस्य

21 Nov 2024 02:33:11
 
Death
 
साधकाच्या स्वभावातील वृत्तीद्वंद्वालाच संत तुकाराम महाराज ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे म्हणतात. कौरव-पांडवयुद्ध आणि नचिकेतस-वाजश्रवसवाद अशाच प्रकारचा आहे. बाहेरील संकटे साधक दूर करेल, पण वृत्तींचे युद्ध करणे कठीण असते. तेथे विवेकच काम करेल. विवेक ही सद्बुद्धी होय. साधनाकालात ही सद्बुद्धी साधकात सदा जागृत हवी, म्हणूनच रामायणात रामरुप साधकाच्या वनातील 14 वर्षांच्या साधनाकाळात, विवेकरुप लक्ष्मण सदा जागृत होता. पांडवांची विवेकबुद्धी भगवान श्रीकृष्ण पांडवांचे नेहमी सल्लागार होते म्हणून साधकातील कौरव-पांडवरुपी वृत्ती युद्धात, पांडवच विजयी झाले. उपनिषदे सांगतात -
 
‘आत्मानं रथिनंविद्धि शरीरं रथमेव तुखबुद्धी तू सारथी विद्धि मनः प्रग्रहमेवच्॥
उपनिषदे असल्या विवेक बुद्धीचे (लक्ष्मण आणि श्रीकृष्ण), साधकाच्या शरीररुप रथाचे, रथाचा स्वामी साधक याचे आणि त्या शरीररुप रथाच्या चार पुरुषार्थरुप अश्वांचे, लगाम असलेल्या मनाचे वर्णन करतात.
 
उपनिषदे रुपकात्मक भाषेत सांगतात-
प्रणवो धनुः शरोह्यात्मा ब्रम्हतल्लक्षम् उच्चते॥
म्हणजे आत्मसाधना हे धनुष्य, आत्मा हा बाण असून त्या बाणाला साधकाने ब्रह्मात मारले पहिजे. राम व अर्जुन असेच कुशल धनुर्धारी होते.
 
मागील लेखात आपण पहिले की, सत्य जाणण्याची नचिकेतस वृत्ती साधकाला खोट्याच अभिनिवेशात राहू देईना. म्हणून पितारुप वाजश्रवस वृत्तीची इच्छा जमेस धरून, नचिकेतस शवासन साधना करून प्रत्यक्ष यमाच्या द्वारी जातो. म्हणजे मृत्यूनंतर येणार्‍या दिव्य जीवनाचा अनुभव घेऊन, जीवनाचे सत्य व आत्मज्ञान जाणण्याचा प्रयत्न करतो. कथा लिहायची तर त्यात रोचकता आणली पाहिजे म्हणून, उपनिषदे यम आणि नचिकेतसाचे संवाद सांगतात. यम वा नचिकेतस प्रत्यक्ष कोणी व्यक्ती नव्हेत, तर तो मानवी मनातील वृत्तींचा खेळ आहे. मृत्यूचे सत्यस्वरुप म्हणजे यम होय, तर ते जाणण्याची सत्यसाधकाची जिज्ञासा म्हणजे नचिकेतसाचे यमाशी संवाद करणे होय. आणखी एक गोष्ट साधकाने लक्षात ठेवण्यासारखी आहे. नचिकेतस यमाच्या द्वारी म्हणजे मृत्यूरुप अवस्थेत तीन अहोरात्र होता. उच्च साधनेतील असे रहस्य आहे की, साधक तीन अहोरात्र चिरसमाधीत असल्याशिवाय त्याला आत्मज्ञान होत नाही. तीन दिवस अहोरात्र समाधी लागल्याशिवाय खरे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, याबद्दल संतांच्या कथा आहेत.
 
मागील शतकात होऊन गेलेले महान संत रामकृष्ण परमहंस यांची अशीच एक कथा आहे. त्यांचे गुरू तोतापुरी यांनी रामकृष्णांचा द्वैतभाव काढण्याकरिता, त्यांच्या भ्रूमध्यात तीक्ष्ण काच रोवून तेथे रामकृष्णांना ध्यान करायला लावले. त्यांचे ध्यान द्वैतावस्था पार करून अद्वैतावर तीन अहोरात्र स्थिर झाले. मग त्यांना अद्वैत म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांच्याबद्दलही अशीच कथा आहे.
 
पवन गावचा पवन नावाचा एक राजा होता. तो ब्रह्मज्ञान जाणण्याची इच्छा करीत असे. जो कोणी साधु-महात्मा त्याच्याकडे जाई त्यांनी त्याला ब्रह्मज्ञान न सांगितले, तर त्या साधु-महात्म्यास खोटे समजून तो तलाव खोदण्यास लावी. बरेच कथित साधुसंत अशा तर्‍हेने तलाव खोदण्याच्या कामी लावले गेले. आज भंडारा जिल्ह्यात बरेच तलाव दिसतात, ते पवन राजाचेच पुण्यकर्म होय. हा प्रकार ऐकून, आद्यकवी मुकुंदराज पवन राजाकडे ब्रह्मज्ञान सांगायला गेले. त्यावेळेस राजा वेशीजवळ घोड्यावर आरूढ होऊन वनात शिकारीला जाण्याच्या बेतात होता. इतक्यात मुकुंदराज तेथे गेले आणि राजाला ब्रह्मज्ञान सांगण्याचे अभिवचन देते झाले. राजाला ब्रह्मज्ञान न झाल्यास मुकुंदराजांना तलाव खोदण्यास जावे लागेल, याची स्पष्ट जाणीव पवन राजाने करून दिली. मुकुंदराजांनी पवन राजाची ती अट मान्य केली आणि राजाला ब्रह्म दाखविण्याची ग्वाही दिली. राजा म्हणाला, “कोठे व केव्हा ब्रह्म दाखवाल?” मुकुंदराज म्हणाले, “आताच! घोड्यावर आरूढ असतानाच!” राजाने त्यावेळेस आपला एक पाय घोड्याचे रिकिबीत ठेवला होता. योगी मुकुंदराजांनी राजाचा घोड्याला मारण्याचा चाबूक घेतला आणि राजाच्या पाठीत हाणला. राजाला त्याच अवस्थेत तीन अहोरात्र दिवस समाधी लागली. म्हणून कथेत म्हटले आहे, ‘रिकब में पाँव और ब्रह्म बताव?’ त्यामुळे राजाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आणि तो योगी मुकुंदराजांच्या पाया पडला. नंतर राजाने सर्व साधुसन्याशांना तलाव खोदण्याच्या कामातून मुक्त केले.
 
प्रत्येक साधक एकदमच ब्रह्मपदाला जाऊ शकतो, असे नाही. ब्रह्म जाणण्यास काही काळ जावा लागतो, कित्येक वेळा तो काळ कित्येक मानव जन्मांचा असतो. नचिकेतस आख्यानातील साधकवृत्ती नचिकेतस देहातीत समाधी अवस्था तीन अहोरात्र झाल्याने, नचिकेतसाला मृत्यूचे रहस्य कळून खरे ब्रह्मज्ञान झाले. नचिकेतस आख्यानातील आशय असा आहे.
 
सर्व उपनिषदातील आख्यानात असलीच योगरहस्ये, साधना कथारुप पद्धतीने वर्णन केली आहेत. त्यात साधना इतिहास आहे. श्रीमद् भगवद्गीताही असेच एक ब्रह्मविद्या शिकविणारे उपनिषद आहे. म्हणून गीतेतील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी स्पष्टच लिहिले आहे, ‘ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषद्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ... नाम ... अध्याय.’ यावरून लक्षात येईल की, नचिकेतस आख्यान निरर्थक ऐतिहासिक घटना नसून त्यामागे महान आणि दिव्य ब्रह्मविद्या व योगशास्त्रातील गहन रहस्य आहे.
 
मृत्यूचे अनुभव
 
मागील लेखात साधकाला शवासन साधनेद्वारे शरीरोद्गमन केल्यावर म्हणजेच, लौकिक भाषेत मृत्यू आल्यावर काय अनुभव येतात याचे वर्णन केले आहे. लेखकाने हे वर्णन कोणत्याही पुस्तकातून वाचून न लिहिता, स्वानुभवाने लिहिले आहे. केवळ तथाकथित प्रसिद्धीसाठी चार पुस्तके वाचून स्वतःचे पाचवे पुस्तक लिहिल्याने, समाजाला अशा महत्त्वाच्या विषयावर वैज्ञानिकदृष्ट्या किंवा साधनेच्या दृष्टीने काही लाभ होईल असे वाटत नाही. तसे लिहिणे म्हणजे, ज्याने कधीच शल्यक्रिया केली नाही, अशा व्यक्तीने हृदयशल्यक्रियेवर बोलावे वा हात घालण्यासारखेच आहे. प्रात्यक्षिक करू इच्छिणार्‍या साधकांचे या विषयाकडे ध्यान आकर्षित होऊन, ते या महत्त्वाच्या विषयावर संशोधन करून त्यात अधिक भर घालतील, या इच्छेनेच प्रस्तुत लेखाचा प्रपंच आहे. (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
 
योगिराज हरकरे 
Powered By Sangraha 9.0