॥श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र॥

    21-Nov-2024
Total Views |

Sri Mahishasuramardini Stotra
 
महिषासुरमर्दिनि स्तोत्रामध्ये आचार्य आई महाकालीच्या रौद्ररुपाचे वर्णन करतात. तिचे रुप, स्वरूप कार्य, पराक्रम यांचे यथार्थ वर्णन या श्लोकामध्ये आचार्यांनी केले आहे. अनन्यभावाने शरण गेलेल्या आपल्या लेकराचे कल्याण तत्काळ करण्यास समर्थ असलेल्या जगदंबेच्या स्तुतीपर श्लोकाचे हे निरुपण...
 
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि
दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि
शङ्करतोषिणि
किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि
दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि
रम्यकपर्दिनि शैलसुते॥2॥
 
पदच्छेद
 
सुर=देव, देवता, वरवर्षिणि=वरदानांचा वर्षाव करणारी, दुर्धर=या नावाचा एक असुरहोता, धर्षिणि=त्याला प्रहार करून मारणारी, दुर्मुख=या नावाचा असुर होता, मर्षिणि=झुंज देऊन मारणारी, हर्षरते=अशा रितीने आनंद देणारी किंवा आनंदी असणारी.
त्रिभुवनपोषिणि=तिन्ही लोकांचे पालन-पोषण करणारी, शङ्करतोषिणि=शिवाला प्रसन्न ठेवणारी, किल्बिष=पाप, अपराध, मोषिणि=नाश करणारी, घोषरते=युद्धात आयुधध्वनीना ऐकून आनंदित होणारी.
 
दनुज=दनुचे पुत्र अर्थात दानव, निरोषिणि=संहार करणारी, दितिसुत=दिती पुत्र अर्थात दैत्य, रोषिणि=क्रोधीत होऊन संहार करणारी, दुर्मद=बलाने उन्मत्त दैत्य, शोषिणि=शोषण करून नाश करणारी, सिन्धुसुते=सागर कन्या.
जय जय हे=तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनि=महिषासुर नामक दैत्याचा संहारकरणारी, रम्य=सुंदर, कपर्दिनि=जटाधारी, शैलसुते=हिमालयाची कन्या.
 
शब्दार्थ
 
सूर अर्थात देवांवर वरदानांचा वर्षाव करणारी, दुर्मुख आणि दुर्धर नावाच्या दैत्यांचा संहार करणारी, सतत आनंदात असणारी, तिन्ही लोकांतील जनांचे पालनपोषण करणारी, शिवाला प्रसन्न ठेवणारी, साधकातील सगळे दोष आणि न्यूनत्व दूर करणारी, विविध शस्त्रांच्या घोषाने आनंदित होणारी, दनुज अर्थात दानवांची जी क्षुब्ध मनोवृत्ती आहे, त्या वृत्तीचा नाश करण्यासाठी त्या दानवांचाच नाश करणारी, दितीपुत्र अर्थात दैत्य यांच्यावर क्रुद्ध होऊन त्यांचा संहार करणारी, मदोन्मत्त दैत्यांना भयभीत करून, त्यांना निष्प्रभ करणारी हे सागर पुत्री, हे महिषासुराचे निर्दालन करणारी आणि रम्य केशसंभार असणार्‍या देवी तुझा सतत विजय असो.
 
भावार्थ
 
दुर्गा सप्तशतीमध्ये देवीने सर्व देवांना वरदान दिलेले आहे की, तुम्हाला ज्या ज्या वेळी अत्यंत दुर्धर असे दैत्य सतावतील आणि तुम्हाला त्यांचा निःपात अशक्य होईल, तेव्हा तुम्ही मला आवाहन करा, मी तत्काळ अवतार घेऊन तुम्हाला संत्रस्त करणार्‍या दैत्यांचा नाश करीन आणि तुम्हाला इष्ट लाभ प्राप्त करून देईन. म्हणून देवीचा उल्लेख ‘सुरवरवर्षिणी’ असा केला गेला आहे. देवीने दुर्धर आणि दुर्मुख या दैत्यांचा संहार केला आहे.
 
देवीच्या विभिन्न रुपात तिचे ‘हास्यरते’ हे रूप अत्यंत वेगळे आहे. देवी भक्तांसाठी वरदायिनी आहे. त्यांच्यासाठी तिचे हास्य हे मंद, आश्वासक, प्रेमळ आणि मातृस्वरूप आहे. देवांसाठी तिचे हास्य हे प्रसन्न आणि कामनापूर्ततेचे अभिवचन देणारे आहे. शिवासाठी तिचे हास्य हे त्याच्या कामेश्वर स्वरूपाला तृप्त करणारे आहे आणि राक्षसांना मात्र ती भयभीत करण्यासाठी अट्टहास करत आहे. तिचे वाहन असणारा सिंह, तिच्या त्या रौद्र अट्टहासाला साथ देण्यासाठी जणू ब्रह्मांडाला व्यापणारी गर्जना करतो.
 
देवी जगतजननी आहे. तिने शाकंभरी रूप धारण करून संपूर्ण विश्वाचे पोषण केले आहे. ज्यावेळी मोठा दुष्काळ पडला आणि समस्त जन अन्न मिळत नसल्याने कष्टी झाले, त्यावेळी देवीने अवतार घेऊन स्वशरीरावर शाक अर्थात भाजी उत्पन्न केली आणि त्याद्वारे मानवांचे पोषण केले, हा देवीचा शाकंभरी अवतार आहे.
 
ती मूलप्रकृतिमहामाया सर्व विश्वाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणारी, प्रकृती रूप आहे आणि तिनेच संपूर्ण विश्वावर मायापटल रुपी मोहिनी निर्माण केली आहे. ज्यामुळे जीव जन्ममृत्यूच्या या चक्रात बद्ध राहतो. जगन्माता या रूपाने प्रत्येक जीवात्म्याची क्षुधा आणि तृष्णा तृप्त करणे, हे तिचे कर्तव्य आहे. ती विविध लीलांद्वारे जगद्पोषणाचे कार्य पार पाडते. यज्ञ करताना, ज्यावेळी ऋषी आहुती देतात, त्यावेळी ते ‘स्वाः’ म्हणून आहुती देतात. ही ‘स्वाः’ रूपातील जगद्जननी त्या आहुतींच्या रुपाने देवतांची क्षुधा तृप्त करते आणि त्यामुळे प्रसन्न होऊन, देव पृथ्वीवर जलाचा वर्षाव करतात, ज्यामुळे पृथ्वीवरील जैविक चक्र अव्याहत राहते.
 
कामेश्वर शिवाची पत्नी हे देवीचे एक रूप आहे. हे आदि दंपती निर्मिती, पालन आणि संहार यांच्या योगाने संपूर्ण विश्वाची लीला रचतात, नाट्य रंगवतात. सगुण रुपातील कामेश्वरीया संसाराच्या लीलेमध्ये निर्गुण शिवाला लीन ठेवते आणि या लीलेच्या रूपाने, ती निर्गुणशिवाला प्रसन्न करून घेते. साधकामध्ये असणारे दुर्गुण, त्याच्या मानवी मर्यादा, त्याचे षड्र्िपुंमध्ये बद्ध असणे या सगळ्या दोषांना ‘किल्बिष’ संबोधले जाते. जो साधक पूर्ण शरण भावाने देवीच्या सन्मुख आपल्या या मर्यादांची कबुली देतो, तत्क्षणी करुणामयी देवी त्याच्या या दोषांचा परिहार-शमन करते आणि साधकाची उपासना उर्श्वगामी व्हावी, यासाठी त्याला साहाय्य करते. म्हणून तिला ‘किल्बिषमोषिणी’ असे संबोधले जाते. याचा एक फार सुंदर उल्लेख आदि शंकराचार्यांनी ‘देव्यापराधक्षमापन’ स्तोत्रात केला आहे.
 
मत्समः पातकी नास्ति
पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथा
योग्यं तथा कुरु॥12॥
 
या जगात माझ्यासारखा महापापी व्यक्ती दुसरा कोणी असणार नाही आणि जगात तुझ्याइतकी महापातकांचा नाश करण्यास समर्थ दुसरी कोणी नाही. त्यामुळे हे ध्यानात घेऊन, तू तुला योग्य वाटेल ते कर. अर्थात माझ्यासारख्या पापी व्यक्तीचासुद्धा उद्धार कर. या आवाहनाला प्रतिसाद देऊन, देवी साधकाच्या किल्बिषांचे मोषण अर्थात परिहार करते. सर्व देवांच्या देहात अंशात्मक चेतना रूपाने तीच स्थित आहे. देव हे सूरगण आहेत. अर्थात ते प्रकृतीच्या नियमांचे पालन करत लढणारे योद्धे आहेत. राक्षसांशी लढताना देवपराभूत होतात याचे कारण त्यांचे युद्ध कौशल्य कमी असते असे नसून, ते राक्षसांप्रमाणे विधिनिषेध-शून्य युद्ध करत नाहीत.
 
राक्षसांकडून पराभूत झालेले देव जेव्हा देवी भगवतीला आवाहन करतात, त्यावेळी ती सर्व देवांच्या देहापासून विलग होऊन प्रकट होते. अर्थात सर्व देवांच्या शक्तींचा समुच्चय म्हणजे देवी भगवती आहे. परंतु, तिची युद्धपद्धती मात्र देवांपेक्षा भिन्न आहे. देवांचे युद्धकौशल्य तर तिला तेज रूपाने मिळाले आहेच, परंतु यापुढे जाऊन राक्षसांशी लढताना मायायुद्ध आणि अन्य देवांना निषिद्ध असणारे युद्ध प्रकारसुद्धा ती वापरण्यास कचरणार नाही.
 
त्याचे कारण देवीचे मूलभूत स्वरूप हे प्रकृतीचे आहे. राक्षस प्रकृतीच्या नियमांनी बद्ध राहण्यास तयार नाहीत आणि म्हणून त्यांना दंड देताना, प्रकृतीच्या नियमांच्या बाहेर जाऊनही त्यांना शिक्षा देण्यासाठी देवी वचनबद्ध आहे. ती रणकर्कश्श अर्थात अत्यंत घनघोर युद्ध करण्यात निपुण असणारी योद्धा आहे. देवीचा अवतार किंवा संभव हाच त्यावेळी होतो, ज्यावेळी असुरांनी देवांना पराभूत केलेले असते आणि त्यांना देवीच्या रौद्र रुपाची आवश्यकता असून त्यांचे रक्षण करणारे तिच्याशिवाय अन्य कोणीही नसते. त्यामुळे देवी सर्व देवांच्या अंशात्मक शक्तींच्या समुच्चयाने, पूर्णस्वरूपास प्राप्त होऊन युद्धास सज्ज होते. युद्ध सज्जतेची घोषणा म्हणजे शंखनाद, अट्टहास, सिंहाची आरोळी, राक्षसांचा, देवगणांचा युद्धघोषाचा गजर आणि शस्त्रांचा खणखणाट. युद्धदेवता असणारी महाकाली या घोषांनी अत्यंत प्रसन्न चित्त होते.
 
दनुज अर्थात राक्षस हे अत्यंत क्रुद्ध असतात, युद्धसज्ज देवी त्यांच्या या रोषाचे शमनयुद्धात त्यांचा संहार करून करते. दितीसुत अर्थात दितीचे पुत्र त्यांचा उल्लेख दैत्य असा केला जातो. देवी अत्यंत क्रुद्ध होऊन, या दैत्यांचा रणात संहार करते. ज्यावेळी देवी सिंहारूढ होऊन अट्टहास करत मदोन्मत्त दैत्यांवर हल्ला करते, त्यावेळी तिच्या या रौद्र आणि उग्र रुपाला पाहून आणि सिंहाच्या गर्जनेमुळे दैत्य भयभीत होतात आणि त्यांच्या शरीरातील रक्तही सुकून जाते आणि त्यांचा नाश होतो. अर्थात दैत्यांच्या शरीरातील द्रव शोषले जाऊन त्यांचा नाश होतो. हे कार्य करणारी देवी महालक्ष्मी रुपात आहे. महालक्ष्मीचा संभव अर्थात उदय हा सागरमंथनातून झालेला आहे. म्हणून तिचा उल्लेख सागरसंभवा, सागरजा, सागरकन्या अर्थात ‘सिंधूसुते’ असा केला जातो.
 
‘रम्यकपर्दिनि’ अर्थात तिच्या मस्तकी असलेला केशसंभार हा जटास्वरूप आहे,असेच जटारूप शिवाचेसुद्धा आहे. त्या अर्थाने या पतीपत्नींचे ऐक्य दाखवले आहे. हा केशसंभार अत्यंत रमणीय आहे. सर्व असुर, दैत्य, दानव यांचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे, तुझा सतत जय असो. 
 
सुजीत भोगले