मतदानासाठी ठाणे जिल्हा सज्ज जिल्ह्यात १८ विधानसभेसाठी २४४ उमेदवार रिंगणात
एकूण मतदार ७२ लाख, २९ हजार आणि कर्मचारी ३० हजार, ८६८
20-Nov-2024
Total Views |
ठाणे : महाराष्ट्रातील लोकशाहीच्या उत्सवासाठी ठाणे जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान ( Voting ) होत आहे. एकूण ७२ लाख, २९ हजार, ३३९ मतदारांच्या हाती २४४ उमेदवारांचे भवितव्य आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेची संपूर्ण तयारी झाली असून, मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्यासह नेमून दिलेल्या केंद्रात रवाना झाले आहेत.
जिल्हाभरात २४ भरारी पथके व १८ विशेष कंपन्यासह १५ हजार, ९६ इतका फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या १८ मतदारसंघात एकूण २४४ जण रिंगणात आहेत.
जिल्ह्यात एकूण ७२ लाख, २९ हजार, ३३९ मतदार आहेत. यात ३८ लाख, ४५ हजार, ४२ पुरुष तर ३३ लाख, ८२ हजार, ८८२ महिला १ हजार, ६०३ सैनिक, १ हजार, ४१५ तृतीयपंथी आणि ३८ हजार, १४९ दिव्यांग मतदार आहेत. १ लाख, ७२ हजार, ९८१ युवा मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. सर्वाधिक ५ लाख, ४५ हजार मतदार ओवळा-माजिवडा मतदारसंघात तर सर्वांत कमी २ लाख, ८३ हजार, ३९७ मतदार उल्हासनगर मतदारसंघात आहेत. आजवरच्या निवडणुकीत जेमतेम ४८ ते ५३ टक्के मतदान झाले आहे. मात्र, यावेळी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
६ हजार, ९५५ मतदान केंद्र
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात एकूण ६ हजार, ९५५ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्र सीसीटिव्ही कॅमेर्याच्या निगराणी खाली आहेत. तर एकूण ३० हजार, ८६८ कर्मचार्यांना विविध जबाबदार्या देण्यात आल्या असून, मतदान केंद्रात मोबाईल नेण्याला बंदी आहे.
मतदान प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी १० हजार, ९३५ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि ४ हजार, १६१ होमगार्ड असे एकूण १५ हजार, ९६ जणांची कुमक आणि २४ भरारी पथके तसेच, राज्य राखीव पोलीस बल तीन, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल पाच, केंद्रीय राखीव पोलीस दल तीन, सीमा सुरक्षा बल चार, उत्तराखंड राज्य राखीव दल तीन असे एकूण १८ कंपन्याचे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.