ठाण्यातील चार विधानसभा क्षेत्रात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मतदार याद्यामध्ये घोळ कायम

    20-Nov-2024
Total Views |
Thane Voting

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढाईत या खेपेला मनसेही रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. ठाणे ( Thane ) महापालिका क्षेत्रात येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी - पाचपाखाडी, ओवळा - माजिवडा आणि मुंब्रा कळवा या चार विधानसभा क्षेत्रात बुधवारी (ता.२० नोव्हे.) मतदानाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदारांमध्ये उत्साह दिसुन आला.

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदाना दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका फारसा जाणवला नाही. त्यामुळे सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ठाणेकर घराबाहेर पडले होते. सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली मात्र बुधवार वर्कीग डे असल्याने पहिल्या दोन तासात साधारण सात टक्केच मतदान झाले त्यानंतर मतदानाचा वेग वाढुन ११ वाजेपर्यंत साधारण १७ ते १८ टक्के मतदान झाले.दुपारच्या वेळेत मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर पडणार नाहीत असा अंदाज होता. मात्र दुपारी १२ ते ३ या वेळेत देखील मतदानाचा उत्साह बघायला मिळाला. ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यंदा मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याने ३ वाजेपर्यंत सरासरी ४० टक्के मतदान झाले. तर ५ वाजेपर्यंत सरासरी ५२ टक्के मतदान झाले. सायंकाळी शेवटच्या तासात मतदार राजा आणि महिलावर्गाला मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी राजकिय पक्षांचा आटापिटा सुरू होता.

दिग्गज उमेदवारांसह शासकिय अधिकाऱ्यांनी बजावला मत हक्क
 
ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील दिग्गज उमेदवारांसह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सपत्नीक तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कोपरी पाचपाखडी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. भाजपचे संजय केळकर यांनी वन विभाग कार्यालयातील केंद्रावर चक्क रांग लावून सहकुटुंब मतदान केले. तसेच, प्रताप सरनाईक यांनी पोखरण नं २ ओसवाल पार्क, नजीब मुल्ला यांनी राबोडी शाळेत, राजन विचारे सेंट जॉन शाळेत, जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र विद्यालय, केदार दिघे यांनी कासारवडवली, नरेश मणेरा यांनी आनंदनगर, अविनाश जाधव यांनी सरस्वती शाळेत आणि मनसेच्या संदीप पाचंगे यांनी वर्तकनगर थिराणी विद्यामंदिर येथे मतदान केले.

मतदार याद्यातील घोळामुळे ससेहोलपट

लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभेलाही मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आला. अनेक ठिकाणी दुबार आणि मयतांची नावे यादीमध्ये आढळली. स्त्री मतदाराला यादीत पुरुषाचा फोटो असल्याने मतदानाचा अधिकार नाकारल्याची घटना कोपरीत घडली. तर ठाणे शहर मतदार संघातील घोडबंदर रोडवरील अनेक मतदारांची नावे घराजवळील मतदान केंद्राऐवजी दूरच्या स्लम भागतील मतदान केंद्रावर आल्याने मतदारांची ससेहोलपट झाली.