प. बंगाल येथे काळीज हेलावून टाकणारी घटना, नवजात अर्भकास भटक्या कुत्र्याने पळवले

भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सुनावले

    20-Nov-2024
Total Views |
 
 West Bengal
 
बांकुरा : पश्चिम बंगाल  (West Bengal) येथील बांकुरा येथे सोनामुखी ग्रामीण रुग्णालयात एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका नवजात अर्भकाला एका भटक्या कुत्र्याने पळवून नेले. पीडितेला रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने पीडितेने नवजात अर्भकाला प्रसाधनगृहातच जन्म दिला. मुलाचा जन्म वेळेपूर्वी झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना घडली आहे. पीडितेचे नाव प्रिया रॉय आहे.
 
यावेळी पीडितेच्या पोटात प्रचंड दुखू लागल्याने प्रियाला रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. यानंतर तिला लघवीचे काही नमुने तपासणीसाठी मागवण्यात आले होते. लघवीच्या नमुन्यांसाठी पीडितेने शौचालयात प्रवेश केला असता तिला तीव्र वेदना जाणवू लागल्या असून तिने जमिनीवरच एका अर्भकाला जन्म दिला. यानंतर तातडीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला.
 
कुटुंबीयांनी आता रुग्णालयाच्या व्यवस्थापन आणि त्यांच्या कामकाजाच्या निष्काळजीपणावर आरोप केले आहेत. प्रियाची काळजी घेण्यासाठी कोणीही आले नसल्याचे सांगितले आहे. नवजात बालकालाही शौचालयात एकटे सोडण्यात आले होते. कुटुंबीय परतले तेव्हा त्यांना जन्माला आलेले बाळ बेपत्ता असल्याचे लक्षात आले. तेव्हा एक भटका कुत्रा नुकत्याच जन्माला आलेल्या अर्भकास घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले. याच घटनेवर भाजपने प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरले आहे.
 
भाजपची ममता बॅनर्जींवर टीका
 
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक पोस्ट शेअर केली आणि त्यांनी पीडितेची गंभीर परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, एका भटक्या कुत्र्याने जन्मलेल्या लहान बाळाला पळवून घेऊन नेल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
 
 
 
त्यांनी लिहिले की, "पश्चिम बंगालमधील सोनामुखी येथून एक भयानक घटना समोर आली आहे. ममता बॅनर्जींच्या तथाकथित जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये, गर्भवती महिलेला प्रदिर्घ प्रसूती वेदना सहन केल्यानंतर कोणत्याही मदतीशिवाय शौचालय प्रसूती करण्यास भाग पाडण्यात आले गेले. दु:खद बाब म्हणजे अशी की, मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याने नवजात अर्भकाला हिसकावून पळ काढण्यात आला हे भयानक हृदयद्रावक आहे.”