मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्याकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात पैशांचे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. बारामती अॅग्रोच्या अधिकार्यांकडून कर्जत-जामखेडमध्ये हे पैशांचे वाटप सुरु असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. या अधिकार्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचे घबाडही सापडले आहे.
महाराष्ट्र भाजपच्या ‘ट्विटर’ हॅण्डलवरून रोहित पवारांवर आरोप करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याचीही मागणीही करण्यात आली आहे. तसेच, यावर खा. सुप्रिया सुळेंनी आता मूग गिळून गप्प बसू नये, असेही भाजपने म्हटले आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघातील नान्नज येथे रोहित पवारांच्या माणसांकडून पैसे वाटप केल्याचा दावादेखील भाजपने केला आहे. मोहिते नावाचा व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचा राम शिंदे यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्तीला पैशांसह लोकांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी सुरु झाली आहे.
‘मविआ’चे पितळ उघड
महाविकास आघाडीचे पितळ उघड पडले आहे. रोहित पवारांच्या कंपनीतून दारू, पैसे कसे वाटप करायचे याची जंत्री हातात आली आहे. संजय राऊत यावर टिपण्णी करणार का? महाविकास आघाडी काय करतेय ते महाराष्ट्र पाहत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सत्य उघड होईल.