मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी परदेशी चलन बिटकॉईनचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीकरिता बिटकॉईन विकून पैसा गोळा केल्याचा आरोप काल आम्ही केला. कारण बिटकॉईनला आपल्या देशात कायदेशीर मान्यता नाही. अशावेळी बिटकॉईनच्या व्यवहारामध्ये सुप्रिया सुळे यांचा गौरव मेहता, गुप्ता याच्याशी संवाद, संपर्क झाल्याचे समोर येतेय. या प्रकरणात सुप्रिया सुळे यांची नेमकी भुमिका काय? अशी आम्ही मागणी केली होती. मात्र तशी भूमिका स्पष्ट झालेली नाही.
अशा प्रकारचा संवाद गौरव मेहता आणि गुप्ता यांच्याशी झालेला आहे. व्होईस नोटमध्ये आवाजही सुप्रिया सुळे यांच्या आवाजाशी मिळताजुळता आहे. अजित पवार यांनीही हा आवाज तसा वाटत असल्याचे म्हटलेय. काल केलेल्या आरोपांचा कुठेही रिप्लाय दिला गेला नाही. व्होईस रेकॉर्ड तपासण्याचे काम यंत्रणा करतील. बिटकॉईनमध्ये अधिकृत की अनधिकृत व्यवहार होते, काळा पैसा बिटकॉईनच्या माध्यमातून गुंतवला जातोय आणि दलालांच्या माध्यमातून पैसे घेऊन निवडणुकीत घोटाळा करून त्या जिंकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी होणे गरजेचे असल्याचेही दरेकर म्हणाले.
तसेच डिजिटल घोटाळ्यातून महाविकास आघाडीतील नेत्यांचे खरं रूप समोर आलेय. महाराष्ट्रातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी अन्यथा महाराष्ट्रातील जनता या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दरेकरांनी दिला.