फणसाड अभयारण्याला पर्यटकांची पसंती

वाढत्या थंडीमुळे रायगडच्या समुद्र किनार्‍याला पर्यटकांची भरती

    20-Nov-2024
Total Views |
Phansad

पेण : मुंबईपासून १५४ किमी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर ५२ चौ. किमी क्षेत्रावर विस्तारलेल्या या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फणसाड ( Phansad ) अभयारण्याचे क्षेत्र मुरुड-जंजिरा संस्थानाचे नवाब सिद्दी यांचे राखीव शिकार क्षेत्र होते.

भारतातून हजारो पर्यटक दिवाळी सुटीत फणसाडला भेट देतात आणि खास करून पावसाळी अतिशय सुंदर वातावरण असते. घनदाट झाडी असल्याने पावसाचे प्रमाण खूप आहे आणि उंचावर असल्याने पावसात धुक्यासारखे वातावरण असते. शेकडो पाणवठे पावसाच्या पाण्याने भरून जातात. प्राणी जलक्रीडा करण्यासाठी पाणवठ्यावर येतात. फणसाड धरण पूर्ण भरून त्याच्या वाहून जाणार्‍या पाण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक बोर्लीमांडला मार्गे भोईघर गावात येतात. गावातून धरण दहा मिनिटांवर असल्याने गावाला पर्यटन व्यवसाय मिळतो. फणसाड धबधब्याला हिरव्यागार भातशेतातून जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. यावर्षी फणसाडला पर्यटकांची संख्या वाढणार आहे. कारण, निसर्गप्रेमींना मुंबई-पुण्याहून तीन तासांवर फणसाड असल्याने एका दिवसात पाहून जाता येते. ‘फणसाड अभयारण्या’त साग व निलगिरीची रोपवने यांसह प्रामुख्याने ऐन, किंजळ, जांभूळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या यांबरोबरच सीताअशोक, सर्पगंधा, कुरडु, रानतुळस, कढीपत्ता उक्षी या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेली व जगातील सर्वात लांब वेलींपैकी एक असलेली गारंबी.

अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष वाटा (ट्रेल) तयार केल्या आहेत. त्यात फणसाडगाण, धरणाधीमान, चिखलगाण, सावर तलाव, सुपेगाव देवराई यांचा समावेश आहे. गाण म्हणजे पाण्याची जागा. ‘फणसाड वन्यजीव अभयारण्या’त तब्बल २७ पाणस्थळे आहेत. यातील चिखलगाया पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळून निरीक्षण करता यावे, म्हणून येथे खास एक लघुगृह बांधण्यात आले आहे. पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. यातून दिसणारे दृश्य मन मोहून टाकते. स्थानिकरित्या आढळणारे जांभा दगडातील नवाबाने खास शिकारीसाठी बांधलेले आडोसे जागोजागी आजही पाहावयास मिळतात. ठराविक प्राणी-पक्षी या ठिकाणी हमखास दर्शन देतात. पर्यटकांना वनभोजनाचा आनंद गावातील महिला बचतगट स्वस्त व चविष्ट भोजन देतात.

पर्यटकांची संख्या अचानक वाढल्याने पेण महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

सलग तीन दिवस वाढत्या थंडीमुळे पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील हजारो पर्यटकांनी रायगड जिल्हा गाठला. त्यामुळे अलिबाग, किहीम, नागांव, रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धन, काशीद, नांदगाव, दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्र किनार्‍याला पर्यटकांची भरती आली होती. जैवविविधतेच्या निरीक्षणासाठी व पशुपक्षी निरीक्षणासाठी वनविभागाकडून विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतात. त्यासाठी ‘फणसाड अभयारण्या’त येणार्‍या पर्यटकांसाठी प्रौढास ६० रु, तर १२ वर्षांखालील मुलांसाठी ३० रु शुल्क आकारले जाते.

नारायण राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी फणसाड