दक्षिण मुंबईकरांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

मलबार हिल, कुलाबा, भायखळ्यात महायुतीला पसंती; शिवडीत मनसेच्या विजयाचे संकेत

    20-Nov-2024
Total Views |
Mahayuti

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला. येथील बहुतांश बुथवर महायुतीचा ( Mahayuti ) बोलबाला दिसून आला.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा हे सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांनी केलेली विकासकामे आणि मतदारांशी असलेल्या जनसंपर्काच्या जोरावर ते विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, अशी प्रतिक्रिया बहुतांश मतदारांनी व्यक्त केली. कुलाबा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार अगदीच अपरिचित असल्यामुळे भाजपचे राहुल नार्वेकर विजयी होतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत भायखळ्यात यामिनी जाधव यांना मोठी पिछाडी मिळाली होती. मात्र, मतदार विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हला एकदा फसले, पुन्हा फसणार नाहीत. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे जाधव यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. शिवडीमध्ये यंदा परिवर्तन अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. बाळा नांदगावकर यांना भाजप महायुतीने पाठिंबा दिल्यामुळे अजय चौधरींची हॅट्रिक हुकणार, अशा चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळाल्या.

मुंबादेवी मतदारसंघात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. काँग्रसेच अमिन पटेल विरुद्ध शिवसेनेच्या शायना एन. सी. यांच्यात सामना होत आहे. मात्र, मुस्लिमबहुल मतदारसंघ असल्यामुळे लढत अटीतटीची राहील. पटेल यांच्याविरोधात स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसली. ही नाराजी मतांमध्ये परावर्तीत झाल्यास शायना एन. सी. विजयी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विकास कामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहणे हे मतदार म्हणून आमचे कर्तव्य आहे. आमच्या विद्यमान आमदाराने गेल्या ३० वर्षांत या मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला आहे. त्यामुळे माझे मत त्यांनाच. ते सातव्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आहे.

हेमंत सावंत, मतदार, मलबार हिल मतदारसंघ