'तणमोर’ म्हणजेच ’लेसर फ्लोरिकन’ हा भारतात प्रदेशनिष्ठ असलेला पक्षी आहे. जगात नर तणमोरांची संख्या ३०० ते ७०० दरम्यान नोंदवण्यात आली आहे. अशा 'नष्टप्राय' श्रेणीतील पक्ष्याची नोंद पुण्यातील भिगवणच्या माळरानवरुन झाली. भिगवणचा परिसर हा पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध झाली आहे. याठिकाणच्या पाणथळ आणि गवताळ प्रदेशात पक्षीनिरीक्षण करण्यासाठी देशभरातून पक्षीनिरीक्षक येत असतात. शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी कोलकत्यावरुन पक्षीनिरीक्षक सौम्या बंद्योपाध्याय, देवर्षी दत्तगुप्ता, कृष्णेन्दु, सौविक कुंडू, सौमित्र बिस्वास भिगवण येथे पक्षीनिरीक्षणाकरिता गेले होते. त्यांच्यासोबत स्थानिक पक्षी मार्गदर्शक दत्ता कुंडरे हे होते. यावेळी दुपारच्या सुमारास आम्हाला तणमोर पक्ष्याचे दर्शन झाल्याची माहिती सौम्या बंद्योपाध्याय यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. शुक्रवारी दिसलेला तणमोर ही मादी असून यापूर्वी देखील या परिसरात आम्हाला तणमोर पक्षी दिसल्याचे दत्ता कुंडरे यांनी सांगितले.
तणमोरांच्या अधिवासासाठी आवश्यक असणार्या गवताळ प्रदेशांचा मोठ्या प्रमाणात र्हास झाला आहे. वीजवाहक तारांचाही या पक्ष्यांना धोका आहे. हे पक्षी स्थलांतरादरम्यान रात्रीही प्रवास करत असल्याने वीजवाहक तारांमध्ये अडकून त्यांचा मृत्यू होतो. 'दी कॉर्बेट फाऊंडेशन'ने गुजरात वन विभागाच्या मदतीने उपग्रह टॅगिंग केलेला 'एलएफएम-९' हा नर तणमोर पक्षी आपल्या स्थलांतरदरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, शिरुर, हवेली, पुरंदर आणि बारामती या तालुक्यांमधील गवताळ प्रदेशांमध्ये थांबल्याची माहिती फाऊंडेशनचे संचालक केदार गोरे यांनी दिली. यावरुन पुणे जिल्ह्यातील गवताळ प्रदेश हे नष्टप्राय श्रेणीतील तणमोरांसाठी किती आवश्यक आहेत, हे लक्षात येते.
तणमोरांविषयी...
तणमोर ( lesser florican ) हा साधारण कोंबडीएवढा आकाराचा छोटा पक्षी आहे. त्याचा आकार 45 सेंमी आहे. तणमोराचे नर आणि मादी हे दिसायला सारखेच मातकट रंगाचे त्यावर तुटक काळ्या रेषा असलेले असतात. मात्र, विणीच्या हंगामात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजूने एक तुरा येतो. तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. या पक्ष्याचे शेपूट आखूड असते. पावसाळी हंगामात या पक्ष्यांच्या विणीचा काळ असतो. या काळात नर हा मादीला रिझवण्यासाठी साधारण चार फुटांच्या उड्या मारतो. याच वेळी तणमोराचे ( lesser florican ) नर दृष्टिपथात येतात. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसल्याने तो जमिनीवर घरटे बांधतो आणि त्यामध्ये साधारण दोन ते चार अंडी घालतो. गवताळ माळराने, सोबत कोरडवाहू शेती यासारख्या अधिवासांमध्ये हा पक्षी राहतो. अत्यंत सावध, लाजाळू असल्याने क्वचितच दिसतो.