कल्याणमधील 'ओरॅंगुटॅन'विषयी वन विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय; होणार याठिकाणी रवानगी

    20-Nov-2024
Total Views |
kalyan orangutan



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गेल्या आठवड्यात वन विभागाने कल्याणमध्ये वन्यजीव तस्करीमधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला (kalyan orangutan) मूळ देशात पाठवण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिले आहेत. सध्या या प्राण्याची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली असून या प्राण्याला मूळ देशात पाठवण्याची तयारी वन विभाग करत आहे. (kalyan orangutan)
 
 
 
वन विभागाने ९ नोव्हेंबर रोजी पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती. कल्याण-शिळ फाट्यावरील एक्स्पिरिया मॉलजवळील पलवा सिटीमधील सवरना इमारतीतील एका खोलीवर टाकलेल्या छाप्यात काही विदेशी प्राणी आढळून आले. विदेशी साप, अजगर, कासव, सरडा आणि महत्वाचे म्हणजे ओरॅंगुटॅन या प्रजातीचे माकड वनकर्मचाऱ्यांनी यावेळी ताब्यात घेतले होते. या सर्व प्राण्यांची रवानगी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली आहे. यामधील ओरॅंगुटॅन या प्राण्याला त्याच्या मूळ देशात पाठवण्याचे आदेश मुख्य वन्यजीव रक्षकांनी ठाणे वन विभागाला दिले आहेत.
 
 
 
याबाबत मुख्य वन्यजीव रक्षकांनी ठाणे वन विभागाला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "या प्राण्याला मूळ अधिवासात/देशात परत पाठिवणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी. तसेच या प्राण्याच्या पुढील उचित काळजी घेणे बाबत हैद्राबाद व म्हैसूर आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान यांच्याशी संपर्क साधण्यात यावा आणि पुढील कार्यवाही करण्यात यावी." या पत्राची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याची तयारी ठाणे वन विभागाने सुरू केली आहे. याबाबत ठाणे वन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ओरॅंगुटॅनला मलेशिया किंवा इंडोनेशियामधील त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत.