दुर्दैवी! बीडमधील अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मतदान केंद्रावरच मृत्यू
20-Nov-2024
Total Views |
बीड : (Beed) बीड विधानसभा मतदारसंघातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड विधानसभेत एका अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
मतदानाच्या दिवशी एकीकडे सुरु असलेल्या राड्यामुळे बीड जिल्हा चर्चेत असतानाच, दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. त्यामुळे, मतदानाच्यादिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् ते खाली पडले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून उमेदवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनाही या घटनेनं मोठा धक्का बसला आहे.