ओपनएआयला दिल्ली उच्च न्यायालयाचा समन्स

    20-Nov-2024
Total Views |
OpenAI

नवी दिल्ली : एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) ने चॅटजीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने अनधिकृतपणे वापरल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ओपनएआयला ( OpenAI ) समन्स जारी केले आहे.

कॉपीराइटशी संबंधित समस्येचे महत्त्व आणि चॅटजीपीटीसारख्या एआयमॉडेलद्वारे सार्वजनिकरित्या उपलब्ध सामग्रीचा वापर लक्षात घेता, न्यायालयाने सांगितले की ते या प्रकरणात ॲमिकस क्युरीची नियुक्ती करतील. चॅटजीपीटीविरुद्ध अंतरिम निर्देश मागणाऱ्या एएनआयच्या याचिकेवर न्यायालयाने ओपनएआयला नोटीसही जारी केली.

न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी ओपनएआयचादेखील जबाब नोंदवला. त्यामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेली सामग्री चॅटजीपीटीद्वारे वापरली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी एएनआयची अधिकृत वेबसाइट आधीच ब्लॉक केली गेली आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

एएनआयतर्फे वकील सिद्धांत कुमार यांनी युक्तिवाद केला. त्यांनी चॅटजीपीटी कसे कार्य करते ते न्यायालयाला सांगितले. चॅटबॉटला प्रशिक्षण देण्यासाठी वृत्तसंस्थेचे कॉपीराइट केलेले साहित्य वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ बातम्यांचा मजकूर सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्याने ओपनएआयला त्याचे शोषण करण्याचा किंवा संग्रहित करण्यासाठी त्याच्या प्रती बनवण्याचा अधिकार मिळत नसल्याचेही त्यांनी न्यायालयास सांगितले.