काँग्रेसी गोंधळ

20 Nov 2024 10:53:16

congress
 
 
लोकसभेची निवडणूक असो वा विधानसभेची निवडणूक, काँग्रेस पक्षाने ‘जातनिहाय जनगणना’ हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातून मोदी सरकार कसे जातविरोधी आणि आरक्षणविरोधी आहे, यासाठी काँग्रेसने आरोपांच्या फैरीदेखील झाडल्या. पण, २०११ साली केलेल्या सामाजिक-आर्थिक राष्ट्रीय सर्वेक्षणातील माहिती सार्वजनिक न करणे ही आमची चूक होती, अशी कबुली खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खा. राहुल गांधींनीच काल दिली. त्यामागच्या कारणांवरही खरं तर राहुल गांधींनी प्रकाश टाकायला हवा होता. पण, तसे न करता त्यांनी केवळ ‘आम्ही चुकलो, नव्याने आता ‘जातनिहाय जनगणना’ झालीच पाहिजे,’ याचीच री ओढली. त्यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, देशातील सर्व जातीपातींची काँग्रेसला खरोखरच इतकी चिंता सतावत होती, तर तेव्हाच जातनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर का केले नाही? २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी त्यावेळी आणखीन तीन वर्षेही शिल्लक होती. मग जातींसंबंधीचा डेटा काँग्रेसला या जातींच्या सर्वांगीण कल्याणासाठीही वापरता आला असता. त्याअनुषंगाने केंद्रापासून ते काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही ही जातनिहाय माहिती वापरुन त्या-त्या जातींचे प्रश्न, त्यांच्या आरक्षणाचे गणितही काँग्रेसला नव्याने मांडता आले असते. पण, काँग्रेसने त्यापैकी काहीही न करता ही माहिती सार्वजनिक करण्याचे धाडस केले नाही. या माहितीचा विरोधी पक्षांना राजकीय फायदा होऊ नये? किंवा आकड्यांच्या आधारावर वाढलेल्या एखाद्या जातीचे वर्चस्वच काँग्रेसला मान्य नव्हते? यांसारखे असंख्य प्रश्न उपस्थित होतात. आज जरी उच्चरवाने काँग्रेस जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरत असली, तरी त्यावेळी सत्ता हाती असूनही संपुआ सरकारने त्या माहितीचा सदुपयोग केला नाही, हे वास्तव. याचाच अर्थ, राहुल गांधी असतील अथवा काँग्रेस पक्ष, त्यांना केवळ जातीपातींवरुन राजकारण करण्यातच अधिक स्वारस्य आहे. अमूक विभागात कोणत्या जातीचे किती सचिव आहेत वगैरे प्रश्न राहुल गांधींना पडतात. पण, देशात एकूण किती जाती-उपजाती आहेत, त्याचे साधे उत्तर तरी राहुल गांधी देऊ शकतील का? त्यामुळे जातींचे आकडे हाती आले तरी त्यांचे करायचे काय, याबाबतचा हा काँग्रेसी गोंधळ या पक्षाची दिशाहीनताच स्पष्ट करणारा!
 
 
बोलाल तितके बुडाल...
 
 
एकीकडे राहुल गांधी यांचा काँग्रेसी गोंधळ कायम असताना, दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा चर्चेत आले. “भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे विषारी असून, राजकीयदृष्ट्या देशातील सर्वाधिक धोकादायक संघटना आहेत,” असे खरं तर विषारी फुत्कार खर्गेंनीच काढले. यावरुन खर्गेंच्या मनात आणि वाणीत भाजप आणि संघाविषयी किती विषारी विचार भिनलेले आहेत, त्याची कल्पना यावी. खर्गेंचे वयवर्षे ८२. त्यामुळे वयोमानापरत्वे बरेचदा आपण काय बोलतोय, याचे खर्गेंचे भान सुटताना दिसले. मागे जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीवेळी आजारी पडल्यानंतरही “मोदींना पराभूत केल्याशिवाय मी मरणार नाही,” असे विधान खर्गेंनी केले होते.
 
निवडणुका म्हटल्या की, टोकाच्या टीकाही आपसुकच आल्या. यंदा महाराष्ट्राच्या निवडणुकीत तर कधी नव्हे इतक्या हिंसक घटनाही निदर्शनास आल्या. पण, मुळात पक्षाच्या अध्यक्षांचेच विचार हे इतके विषारी आणि विखारी असतील, तर मग त्यांच्या अन्य नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ती काय? खरं तर यापूर्वीही मोदी आणि भाजपला उद्देशून काँग्रेस पक्षाने अशीच पातळी सोडून टीका केली होती. ‘मोदींना मौत का सौदागर’, ‘नीच’, ‘राक्षस’ अशी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरुन खच्चीकरणाचे शेकडो प्रयत्न झाले. राहुल गांधींनी तर दंडुक्याने मोदींना मारण्याची भाषाही केली होती. मोदी हे केवळ भाजपचे दिग्गज नेते नसून, ती व्यक्ती देशाची पंतप्रधान आहे, याचे साधे तारतम्यही काँग्रेसला राहिले नाही. पण, इतिहास साक्ष आहे की, ज्या ज्या वेळी काँग्रेसने, त्यांच्या नेत्यांनी भाजपवर, मोदींवर असभ्य शब्दांत टीका-टिप्पणी केली, त्या-त्या वेळी काँग्रेस तोंडावर आपटली आहे. याचाच अर्थ, मोदींच्या विरोधातील काँग्रेसच्या विखारी प्रचाराला मतदारांनी वेळोवेळी मतपेटीतून साफ नाकारले आणि काँग्रेसला त्यांची जागाही दाखवून दिली. त्यामुळे खर्गेंनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात केलेली ही टीकादेखील यंदा काँग्रेसवर ‘बुमरॅन्ग’ होईल, याचीच शक्यता अधिक.
 
एकूणच काँग्रेसच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, ‘बोलाल तितके बुडाल’ ही उक्ती खरी ठरावी. पण, तरीही आपली वाचा आणि कृती सुधारतील ते काँग्रेसी कसले?
Powered By Sangraha 9.0