महायुतीमध्ये सर्वाधिक जागांवर भाजपची लढत मविआशी

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महायुती आणि मविआसोबत मनसेही रिंगणात

    20-Nov-2024
Total Views |
Mahayuti

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवरील निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची असून सर्वाधिक दहा जागांवर भाजपची ( BJP ) लढत मविआतील घटक पक्षांविरुद्ध होत आहे. जिल्ह्यात महायुतीची लढत महाविकास आघाडी सोबत होत असली तरी पाच ठिकाणी मनसे रिंगणात असल्याने लढती रंगतदार झाल्या आहेत. त्यामुळे बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात मतदार राजा कोणाला कौल देतो, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा- माजिवाडा, मिरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड या १८ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या १८ विधानसभा मतदारसंघात एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये १७ विद्यमान आमदार तर एकजण विद्यमान आमदाराच्या सौभाग्यवती आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत असली तरी पाच ठिकाणी मनसेनेही उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय १८ पैकी किमान नऊ विधानसभा मतदारसंघांत बंडखोर उभे असल्यामुळे काही अपवाद वगळता सर्वच मतदारसंघांमध्ये तिरंगी, चौरंगी लढत होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचाही समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात उबाठाने स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना रिंगणात उतरवले आहे.

शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (उबाठा)
कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, भिवंडी ग्रामीण

राष्ट्रवादी (अजितदादा गट) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट)
कळवा-मुंब्रा, शहापूर

भाजप विरुद्ध शिवसेना (उबाठा)
ठाणे, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पूर्व, ऐरोली

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार)
बेलापूर, उल्हासनगर, मुरबाड

भाजप विरुद्ध काँग्रेस
मिरा-भाईंदर, भिवंडी पश्चिम