गजर हिंदू एकतेचा...

    20-Nov-2024
Total Views |

HINDU
 
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ही विकासाच्या मुद्द्यांबरोबरच ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘मतांचे धर्मयुद्ध’ अशी प्रकर्षाने दिसून आली. त्यानिमित्ताने अलीकडच्या काळात देशभरात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली असता, हिंदूंची सामाजिक-राजकीय परिघातील एकता, हिंदूंचे हिंदुत्ववादी पक्षांना उत्स्फूर्त मतदान का आवश्यक आहे, त्याची प्रचिती यावी. अशाच हिंदू एकतेचा गजर अधोरेखित करणार्‍या वर्तमानातील घटनांचे हे प्रतिबिंब...
 
मुस्लिमांना लक्ष्य करणार्‍यांना इशारा
 
मुस्लीम मतदारांचे कशाप्रकारे लांगूलचालन केले जात आहे, याचे एक उदाहरण बिहारमध्ये नुकतेच घडले आहे. ‘इंडी’ आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे एक नेते आणि चाराघोटाळा फेम नेते लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी, “मुस्लिमांना लक्ष्य केल्यास याद राखा,” असा धमकीवजा इशारा विरोधकांना दिला आहे. मुस्लीम मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याची तेजस्वी यादव यांची ही खेळी असल्याची टीका केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलाला लोकसभा निवडणुकीत अवघ्या पाच जागा मिळाल्या होत्या. ते लक्षात घेऊन मुस्लीम मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी तेजस्वी यादव यांनी असा धमकीवजा इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात माजी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी हिंदू स्वाभिमान यात्रा काढली होती. भाजप खा. प्रदीप कुमार सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बिहारमध्ये जातीय तणाव वाढला असल्याचा आरोप राजद नेत्यांकडून करण्यात आला होता. त्या यात्रेवरून तेजस्वी यादव यांनी गिरीराज सिंह यांना लक्ष्य केले होते. तसेच भाजप खा. प्रदीपकुमार सिंह जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला होता. मुस्लीम समाजाकडे कोणी वाईट नजरेने पाहिल्यास त्यांना जबरदस्त उत्तर दिले जाईल, असे सांगण्यास तेजस्वी यादव विसरले नाहीत! बिहारमध्ये जातीय तणाव निर्माण झाल्यास त्यास मुख्यमंत्री नितीशकुमार हेच पूर्णपणे जबाबदार असतील, असा इशारा देण्यास तेजस्वी यादव विसरले नाहीत! आपल्या मतपेढीच्या राजकारणासाठी राजद मुस्लीम समाजाचे कशाप्रकारे लांगूलचालन करीत आहे त्याची या घटनेवरून कल्पना यावी!
 
द साबरमती रिपोर्ट : सत्याचे प्रकटीकरण!
 
फेब्रुवारी २७, वर्ष २००२... हा दिवस हिंदू समाजाकडून कधीच विसरला जाणार नाही! या दिवशी अयोध्येवरून कारसेवा आटोपून ‘साबरमती एक्सप्रेस’ने गुजरातकडे परतणार्‍या कारसेवकांच्या ‘एस-६’ या डब्याला गुजरातमधील गोध्रा स्थानकात आग लावण्यात आली. या आगीत ५९ रामभक्तांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर गुजरात राज्यात उसळलेला भयानक हिंसाचार आपण जाणतोच. त्यावेळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गोध्रा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगली यासंदर्भात विरोधकांकडून अनेक प्रकारे अपप्रचार करण्यात आला. चुकीची, असत्य माहिती पसरविण्यात आली. त्यानिमित्ताने मोदी यांची जेवढी बदनामी करता येईल तेवढी बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. पण, हे सर्व ‘असत्य कथन’ (फेक नॅरेटिव्ह) खोडून काढणारा आणि नेमके सत्य काय होते, हे स्पष्ट करणारा एक चित्रपट नुकताच म्हणजे गेल्या दि. १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सत्य नेमके काय आहे ते या निमित्ताने बाहेर आले आहे. असत्य कथन हे फार काळ काही टिकत नाही. अंतिमत: नेमकी वस्तुस्थिती प्रकट झाली,” असे म्हटले आहे.
 
गोध्रा प्रकरणासंदर्भात ‘द साबरमती रिपोर्ट’ या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. तो चित्रपट आवडल्याचे एका प्रेक्षकाने ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांना टॅग करून कळविले असता, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यास ‘एक्स’वर उल्लेखित उत्तर दिले. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरण यांनी केले असून शोभा कपूर, एकता आर. कपूर, अमूल आर. मोहन आणि अनशूल मोहन यांची निर्मिती आहे. “गोध्रा येथे दि. २७ फेब्रुवारी २००२ साली यादिवशी घडलेल्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात त्यावर नेमके काय घडले हे सांगितले आहे,” असे एकता कपूर यांनी स्पष्ट केले.
 
या चित्रपटाच्या निमित्ताने अद्याप अज्ञात असलेल्या काही गोष्टीही उघड करण्यात आल्या आहेत. घटनेच्या पहिल्या पैलूसह अन्य पैलूंवर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. गोध्रा घटना घडल्यानंतर त्यावेळी केंद्रात सत्तेत असलेल्या नेत्यांनी “साबरमती एक्सप्रेस’च्या डब्याला आतूनच आग लावण्यात आली,” असा अपप्रचार केला होता. “दंगली घडविण्यासाठी मुद्दामच असा प्रकार करण्यात आला,” असेही आरोप करण्यात आले. पण, हे सर्व असत्य कथन असल्याचे या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आले आहे. सत्याला दाबण्याचा, झाकून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी एक ना एक दिवस सत्य प्रकट होतेच, हेच या ‘द साबरमती रिपोर्ट’ वरून दिसून येते.
 
कर्नाटकमध्ये आणखी एक घोटाळा
 
म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या जमीन घोटाळ्याची चर्चा सुरु असतानाच, या ‘मुदा’ प्राधिकरणाने केलेला आणखी एक जमीन घोटाळा समोर आला आहे. या प्राधिकरणाने एका व्यक्तीस १९ भूखंड दिल्याचे उघडकीस आले आहे. कसल्याही स्पष्ट नोंदी नसताना किंवा हे भूखंड कसे संपादित केले, याची कागदोपत्री योग्य आणि पुरेशी नोंद नसताना एका व्यक्तीस हे भूखंडाचे श्रीखंड देण्यात आले. प्रत्यक्षात सुरुवातीस करण्यात आलेल्या करारानुसार केवळ दोन भूखंड द्यायचे असताना ‘मुदा’ने संबंधितांवर कृपा केली आणि १९ भूखंड दिले. ‘मुदा’ ने जे भूखंड वाटले, त्याची लोकायुक्त आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी जवळीक असलेल्या लोकांना या भूखंडांचे वाटप करण्यात आल्याची माहिती बाहेर आली आहे. या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती मिळविण्याचा लोकायुक्तांचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणी पुरावे गोळा केले जात आहेत. अनेकांच्या साक्षी घेतल्या जात आहेत. तसेच अंमलबजावणी संचालनालयाला ‘मुदा’च्या कारभारात अनेक बाबतीत अनियमितता आढळून आली आहे. दोन मंत्री या सर्व व्यवहारात गुंतले असल्याचा आरोप ‘मुदा’च्या काही अधिकार्‍यांनी चौकशी दरम्यान केला आहे. एवढा मोठा भूखंड घोटाळा उघड झाला तरी सिद्धरामय्या आपल्या खुर्चीला चिकटून आहेत. सर्व लाजलज्जा कोळून प्यायले असल्याने पदत्याग करण्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तयारी दिसत नाही. या चौकशीतून आणखी माहिती बाहेर आल्यानंतर तरी सिद्धरामय्या आपले पद सोडतात का हे पाहायचे!
 
ओडिशात हिंदू संघटनांची निदर्शने
 
ओडिशा राज्यात अलीकडेच विविध हिंदू संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी भद्रक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा नेऊन हिंदू समाजाच्या विरुद्ध कार्य करणार्‍या प्रवृत्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. धर्मांध मुस्लीम या जिल्ह्यातील शांतता बिघडवत आहेत, त्यांच्याकडून पोलिसांवर हल्ले केले जात आहेत, हिंदू व्यापार्‍यांना धमकाविले जात आहे, जिल्ह्यात गोवंशाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे, तसेच ‘लव्ह जिहाद’ यासारख्या घटना घडत आहेत. आदी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. ‘हिंदू जागरण मंच’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘बजरंग दल’ आदी संघटनांनी या विशाल मोर्चाचे आयोजन केले होते. अलीकडे पोलीस आणि सर्वसामान्य जनतेवर हल्ले होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत. त्यासंदर्भात त्वरित कारवाई करण्यात यावी, ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे लक्षात घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र दलाची निर्मिती करण्यात यावी, जी बेकायदेशीर धार्मिक स्थाने उभारण्यात आली आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, राज्यात बेकायदेशीरपणे जे विदेशी नागरिक घुसले आहेत, त्यांचा शोध घेण्यात यावा आणि त्यांना राज्यातून हाकलून देण्यात यावे, ऐतिहासिक हिंदू वास्तूंचे जतन करण्यात यावे, ‘हमास’ आणि ‘तेहरिक-ए-तालिबान’ यासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या संशयित व्यक्तींचा शोध घेतला जावा आदी मागण्या या हिंदू संघटनांकडून करण्यात आल्या. ख्रिस्ती धर्म प्रसारकांकडून धर्मांतर करण्याचे जे प्रकार केले जात आहेत, त्यास पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी या हिंदू संघटनांकडून करण्यात आली. हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी शासनाने निर्णायक कृती करावी, अशी मागणीही हिंदू नेत्यांकडून करण्यात आली. विविध राज्यांमधील हिंदू समाज कसा असुरक्षित आहे आणि त्यांना किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्याची कल्पना या घटनेवरून यावी.
 
 

दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२