निमित्त ‘जी२०’चे, आव्हान ऊर्जासुरक्षेचे...

    20-Nov-2024   
Total Views |

modi
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या रिओ दी जनेरिओ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी२०’ परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलच्या दौर्‍यावर गेले असता, तत्पूर्वी त्यांनी आफ्रिका खंडातील नायजेरिया आणि गयानालाही भेट दिली. त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
 
गेल्या वर्षी ‘जी२०’ परिषदेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर भारताने या परिषदेचे नेतृत्व ब्राझीलकडे सोपवले. ‘जी २०’ गटाचे स्थायी मुख्यालय नसल्यामुळे वर्षभरासाठी यजमान देश या गटाचे कामकाज पाहतात. त्यात मागील वर्षाचे तसेच पुढच्या वर्षीचे यजमान देश त्यांना मदत करतात. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत ‘जी२०’ परिषद पार पडणार आहे. त्यामुळे भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेवर या परिषदेची जबाबदारी होती. गेल्या वर्षी यजमानपद भूषवताना भारताने ‘जी२०’ परिषदेला ‘लोकांची परिषद’ बनवले. यानिमित्ताने देशाच्या कानाकोपर्‍यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या तुलनेत ब्राझीलच्या यजमानपदाचे वर्ष कधी पूर्ण झाले, हे कळलेही नाही.
 
यावर्षी सदस्य देशांच्या सर्वोच्च नेत्यांच्या परिषदेची चार सत्रांमध्ये विभागणी करण्यात आली होती. पहिल्या सत्रात भूक आणि गरिबीविरुद्ध लढा देण्यासाठी ‘जागतिक आघाडी’ची स्थापना करण्यात आली. दुसर्‍या सत्रात ‘जागतिक संस्थांमधील प्रशासन यंत्रणेतील सुधारणा’ हा विषय होता. तिसर्‍या सत्रात ‘चिरस्थायी विकास आणि प्रदूषणकारी ऊर्जेकडून स्वच्छ ऊर्जेकडे’ हा विषय होता. समारोपाच्या सत्रात पुढील वर्षाच्या परिषदेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे देण्याची औपचारिकता पार पडली. परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवी सुबिआंतो, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांच्यासह महत्त्वाच्या जागतिक नेत्यांशी भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशीही नरेंद्र मोदींनी चर्चा केली.
 
ब्राझीलमधील परिषदेवर अमेरिकेतल्या निवडणुकांचे सावट होते. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. केवळ अध्यक्षपदच नाही, तर सिनेट आणि प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले. अमेरिकेतील सत्तांतराचे ब्राझीलवर खूप मोठे परिणाम होणार आहेत. ब्राझीलचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष लुला यांचे प्रतिस्पर्धी जाइर बोल्सोनारो हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिशय जवळचे आहेत. सुप्रसिद्ध उद्योजक आणि अमेरिकेच्या सरकारच्या खर्चाला कात्री लावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमणूक केलेले एलॉन मस्क आणि ब्राझील सरकार यांच्यामध्ये ‘ट्विटर’वरुन खडाजंगी झाली होती. लुला यांच्या विजयानंतर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्विटर’वर दोन आठवड्यांची बंदी घातली. तसेच, कंपनीला ५० लाख डॉलर्सचा दंड ठोठावला. ‘जी२०’ परिषदेच्या दरम्यानही लुला यांच्या पत्नीने एलॉन मस्क यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ‘जी२०’ परिषदेला उपस्थित चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, जर्मनीचे ओलाफ शोल्झ, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो या सगळ्यांसाठी ट्रम्प यांचा विजय आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर होणारा परिणाम हा काळजीचा विषय आहे. त्यामुळे या परिषदेच्या निमित्ताने एकमेकांशी आणि अमेरिकेशी संवाद साधण्याची चांगली संधी मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा कार्यकाळ पुढील वर्षी २० जानेवारीला समाप्त होणार आहे, तोपर्यंत ते मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नसले, तरी आपल्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांना पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
ब्राझीलला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अध्यक्ष बोला अहमद टिनुबु यांच्या निमंत्रणावरुन नायजेरियाला भेट दिली. यापूर्वी २००७ साली पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती. नायजेरिया लोकसंख्येच्या बाबतीत आफ्रिकेतील सर्वात मोठा देश आहे. नायजेरियाची लोकसंख्या सुमारे २० कोटी असून, २०५० सालापर्यंत ती ७० कोटी होईल असा अंदाज आहे. नायजेरियाच्या लोकसंख्येपैकी सुमारे ५३ टक्के मुस्लीम असून, ४५ टक्के ख्रिस्ती धर्माचे पालन करतात. भारताप्रमाणे नायजेरियातही सुमारे एक शतकभर ब्रिटिशांची वसाहत होती. दक्षिण आफ्रिकेच्या खालोखाल नायजेरिया आफ्रिकेतील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. नायजेरिया जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक असून, भारत आणि नायजेरिया यांच्यामधील व्यापारात भारताकडून केल्या जाणार्‍या तेलाच्या आयातीचा मोठा वाटा आहे. सुमारे २०० भारतीय कंपन्यांनी नायजेरियामध्ये २७ अब्ज डॉलर्स गुंतवणूक केली आहे. या भेटीत नायजेरियाने नरेंद्र मोदींना ‘ग्रॅण्ड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ हा दुसरा सर्वोच्च सन्मान दिला. यापूर्वी हा सन्मान ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना देण्यात आला होता. व्यापार, शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण आणि माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये उभय देशांतील सहकार्याला मोठा वाव आहे.
 
ब्राझीलहून परतताना नरेंद्र मोदींनी गयानाला भेट दिली. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर किनार्‍यावर वसलेल्या देशाला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. ब्रिटनकडून १९६६ साली गयानाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारताने तेथे आयुक्तालय स्थापन केले होते. गयानाने सर क्लाइव लॉइड, रोहन कन्हाय, कार्ल हुपर ते शिवनारायण चंदरपॉल असे अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू दिले आहेत. गयानाची लोकसंख्या अवघी आठ लाख असून, त्यातील ४० टक्के भारतीय वंशाचे आहेत. गयानाचे अध्यक्ष महंमद इर्फान अलीसुद्धा भारतीय वंशाचे असून २०२३ साली १७व्या प्रवासी भारतीय दिवसाचे ते प्रमुख पाहुणे होते. भारत आणि गयानातील सांस्कृतिक संबंधांचा प्रदीर्घ इतिहास असला, तरी गेल्या काही वर्षांमध्ये त्याला आर्थिक परिमाणही प्राप्त झाले आहे.
 
गयानाजवळच्या समुद्रात तेलाचे मोठे साठे सापडले असून, त्यावर शेजारच्या व्हेनेझुएलानेही दावा सांगितला आहे.
व्हेनेझुएलामध्ये साम्यवादी हुकूमशाही असून त्यांच्याकडील सैन्याची संख्या एक लाखांहून अधिक आहे. गयानाच्या लष्करात अवघे पाच हजार सैनिक असून त्यांना स्वतःच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणे अवघड आहे. व्हेनेझुएलाने अनेक दशकांपासून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या विरोधात बंड पुकारले असून, त्याला रशिया, इराण आणि चीनसारख्या देशांचा पाठिंबा आहे. भारताचेही व्हेनेझुएलाशी चांगले संबंध असले, तरी गयानाच्या भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
 
आजवर भारताने गयानाला विविध क्षेत्रांमध्ये भरीव मदत केली आहे. तेथील ३० हजार घरांमध्ये भारताकडून सौरऊर्जा पुरवण्यात आली आहे. भारताने गयानाला ‘हॅल २२८’ विमान पुरवले असून, भारतीय कंपन्यांनी समुद्रात जाण्यासाठी धक्का बांधून दिला आहे. गयानातील ८०० विद्यार्थ्यांना भारताने उच्च आणि तंत्रशिक्षण दिले असून, ‘वॅक्सिन मैत्री’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ८० हजार लसीही पुरवल्या होत्या. आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रातही भारत आणि गयानामधील सहकार्याला मोठा वाव आहे. आगामी काळात भारताची खनिज तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, त्यासाठी नायजेरिया आणि गयानासारख्या देशांशी चांगले संबंध असणे महत्त्वाचे असणार आहे.
 
मोदींच्या दौर्‍याच्या निमित्ताने गयानामध्ये दुसर्‍या ‘भारत कॅरिकॉम’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॅरिकोम’ या कॅरेबियन देशांच्या गटात २० देश असून पहिल्यांदाच ही परिषद कॅरेबियन देशात पार पडत आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्यासाठी अटलांटिक आणि प्रशांत महासागराच्या किनार्‍यावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या तसेच द्वीपराष्ट्रांशी विशेष संबंध महत्त्वाचा आहेत.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.