नौटंकीबाज विरोधक!

    20-Nov-2024
Total Views |
 
Vinod Tawde
 
मतदानाच्या आदल्या दिवशी अचानक भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे हे पैसेवाटप करित असल्याचा आरोप करणारे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले आणि निवडणुकीत सनसनाटी निर्माण झाली. एकंदर घटनाक्रम पाहिल्यास आणि ठोस पैसेवाटपाच्या दृश्यांच्या अभावी त्यातील सनसनाटीपणा विझून गेला. मात्र, सत्ताधारी नेत्यांविरोधात संशय निर्माण करण्यासाठी विरोधक खोटा बनावही रचू शकतात, हे दिसून आल्याने त्याचा उलटाच परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार झाला, तरी त्यात म्हणावा तितका खमंगपणा नव्हता. संपूर्ण प्रचारकाळ तसा अळणीच गेला. ती कसर मतदानाला दोन-तीन दिवस शिल्लक असताना दोन घटनांनी भरून काढली. नागपूरजवळ प्रचारावरून परत येत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यात देशमुख यांच्या कपाळावर खोक पडल्याची आणि त्यांच्या मोटारीवर एक मोठा धोंडा ठेवल्याची छायाचित्रे अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. हा हल्ला आपल्या विरोधकांनी केल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
 
दुसरी घटना अधिकच सनसनाटी असून ती मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी, मंगळवारी घडली. विरारमधील एका हॉटेलमध्ये बसून भाजपचे महासचिव विनोद तावडे हे मतदारांना पैसेवाटप करीत असतानाचा व्हिडिओ अचानक वृत्तवाहिन्यांवर झळकू लागला. विनोद तावडे यांनी म्हणे, पाच कोटी रुपये सोबत आणले होते. पण, व्हिडिओत केवळ साडेनऊ लाख रुपयांची रोकड दिसते. तसेच, एक कथित डायरी ही असून त्यात म्हणे कोणाला किती लाख रुपये दिले, त्याची नोंद ठेवल्याचे दिसून आले.
 
या दोन्ही घटना अगदी नाट्यमय आणि सनसनाटी वाटतात. संपूर्ण प्रचाराच्या काळात कोठेही हिंसाचार घडल्याचे किंवा तणाव असल्याचे दिसत नव्हते. महाराष्ट्राची ती परंपराही नाही. पण, मतदानाच्या केवळ तीन दिवस आधी नागपूरजवळ माजी गृहमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक केली जाते आणि त्यात स्वत: अनिल देशमुख हे जखमी होतात. त्यांच्या ज्या मोटारीच्या बॉनेटवर एक धोंडा ठेवल्याचे दिसते, त्यावर साधा ओरखडाही आलेला नाही. तसेच, हे चार हल्लेखोर ज्या दिशेने पळून गेले, असे सांगण्यात आले त्या बाजूचे सीसीटीव्हीचे चित्रण तपासले असता, तशी कोणतीही घटना घडल्याचे आढळून येत नाही.
 
या दोन्ही घटना तद्दन फिल्मी आणि मुद्दाम रचलेल्या दिसतात. राज्यातील विरोधी पक्षांकडे सत्ताधारी युतीविरोधात कोणताही ठोस मुद्दा नाही. ना त्यांच्याकडे राज्याच्या विकासाचे स्वत:चे काही मॉडेल आहे. या सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री (शिंदे-फडणवीस) यांच्याही चारित्र्यावर कसलाच डाग नाही. राज्यात विकासकामे विलक्षण वेगाने सुरू आहेत. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांनी महिलावर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. उलट विरोधी पक्षांच्या निव्वळ मुस्लीम मतांसाठी सुरू असलेल्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे जनतेत त्यांच्याविरोधात तीव्र असंतोष असल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांच्या सारख्यांनी आपले वडील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आधीच तिलांजली दिली होती. आता ते बाबरी ढाँचा पाडण्याच्या आणि नंतरच्या राज्यातील मुस्लीम विरोधी दंगलीतील शिवसेनेच्या सहभागाबद्दल माफी याचनेचे तर्पण करताना पाहून त्यांच्या अधोगतीबद्दल जनतेच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. यास्थितीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी काहीच निमित्त सापडत नसल्याने निदान सत्ताधारी नेत्यांविरोधात संशय निर्माण करण्याचे कारस्थान विरोधी पक्षांनी रचले आहे.
 
हे सर्व महाभकास आघाडीच्या नेत्यांच्या चारित्र्याला धरूनच झाले आहे. या महाभकास आघाडीची सत्ता होती, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे फडणवीस, गिरीश बापट वगैरे भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात कसे टाकता येईल, त्याच्या योजना बनवित होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देणार्‍या उद्योगपतीच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी त्याच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात ज्याच्या मोटारीची मदत घेतली, त्यालाच पुरावा नको म्हणून ठार मारण्याइतका अमानुषपणाही या नेत्यांकडे होता. राज्यातील बार मालकांकडून १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचीही योजना होती. या नेत्यांनी आधीच्या सरकारने जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या सर्व विकास योजना बंद केल्या आणि विरोधकांना तुरुंगात टाकण्याच्या योजना बनविल्या. सुदैवाने वेळीच तख्तापालट झाला आणि राज्याची बदनामी टळली. मात्र, यावरून या विरोधकांचे चारित्र्य आणि हेतू काय आहेत, ते जनतेसमोर आले. राज्यातील विरोधी नेत्यांमध्ये लोकशाही आणि प्रामाणिकपणाचा लवलेशही नाही. आपला विरोधक हा आपला शत्रूच असून, त्याचा समूळ नाश केला पाहिजे, हीच हिंस्र आणि असहिष्णू वृत्ती या आघाडीच्या नेत्यांची आहे. त्यामुळे सध्याच्या दोन्ही घटनांबद्दल संशयाची सुई भाजप नेत्यांऐवजी या आघाडीच्या नेत्यांकडेच वळताना दिसते.
 
तावडे यांचे पैसेवाटप प्रकरण हा तर उघडपणे खोटा बनाव असल्याचे दिसते. तावडे यांच्यासारखी भाजपमधील अतिउच्च पदावरील व्यक्ती विरारमध्ये एका हॉटेलात बसून उघडपणे पैसे वाटप करीत आहे, ही कल्पनाही किती बेगडी आणि हास्यास्पद दिसते. ‘कॉमन सेन्स’चा भाग पाहिल्यास तसे काही तावडे करतील, इतके ते राजकारणात नवखे निश्चित नाहीत. ज्याप्रमाणे कधी-कधी एखाद्या व्यक्तीला मुद्दाम खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पोलीसच काही पुरावे पेरतात, तसेच हे प्रकरण वाटते. सीसीटीव्हीवरील व्हिडिओ चित्रण पाहिल्यास खरे-खोटे काय आहे, ते लगेच दिसून येईल. या प्रसंगातील कथित डायरीतील नोंदींचे हस्ताक्षर तावडे यांच्या हस्ताक्षराशी पडताळून पाहता येईल. ज्यांना पैसेवाटप केले, त्या काल्पनिक व्यक्तींचा शोध घेतल्यास हा सर्व बनाव होता, ते सहज स्पष्ट होईल.
 
आता मतदानाच्या दिवशी बारामतीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी बिटकॉईनचे पैशात बदल केल्याची बातमी झळकू लागली. सुळे यांनी कोणा गौरव मेहता या व्यक्तीला दुबईतील आपल्या खात्यातून बिटकॉईन या ‘क्रिप्टो करन्सी’चे भारतीय रुपयांमध्ये रुपांतर करून ते पैसे घेतल्याचा आरोप केला जात होता. त्यांच्या संभाषणाची ध्वनिफीत वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली असून, त्यातील आवाज सुळे यांचाच असल्याचा दावाही काहीजणांनी केला. लगोलग या मेहता यांच्यावर ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी छापेही मारल्याचे वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केले गेले. एकंदरीतच ही विधानसभा निवडणूक अखेरच्या दिवसांमध्ये चांगलीच रंगतदार झाली.या प्रकरणांमध्ये विरोधकांचे पितळ उघडे पाडल्याने त्यांचा डाव ‘बुमरँग’ झाला.
 
 राहुल बोरगावकर