वाटेवर काटे वेचित चाललो...

20 Nov 2024 23:44:46

Russia-Ukraine War
जगात दुसर्‍याच्या भांडणात नाक खुपसून स्वार्थ साधणारा एकमेव देश म्हणजे अमेरिका होय! सूक्ष्म अभ्यास केल्यास असे स्पष्ट दिसून येईल की, आजवर जगात झालेल्या कोणत्याही संघर्षात कायमच अमेरिकेचा स्वार्थ दडलेला आहे. सध्या धुमसत असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातदेखील अमेरिकेने युक्रेनला केलेली सर्व प्रकारची मदत कारणीभूत आहेच.
जगात दुसर्‍याच्या भांडणात नाक खुपसून स्वार्थ साधणारा एकमेव देश म्हणजे अमेरिका होय! सूक्ष्म अभ्यास केल्यास असे स्पष्ट दिसून येईल की, आजवर जगात झालेल्या कोणत्याही संघर्षात कायमच अमेरिकेचा स्वार्थ दडलेला आहे. सध्या धुमसत असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातदेखील अमेरिकेने युक्रेनला केलेली सर्व प्रकारची मदत कारणीभूत आहेच. या युद्धाने आता नव्याने वळण घेतल्याने जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने रशियावर हल्ला केला. मग काय लागलीच रशियानेदेखील आपल्या अणवस्त्र धोरणांमध्ये बदल केले आहेत. हे केलेले बदल जगाला कोणता प्रलय दाखवणार आहेत, याबाबत सर्वांच्या मनातच साशंकता आहे. तशी अजून एक शंका आहे ती म्हणजे, युक्रेनचा हल्ला आताच का? तर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे युक्रेनला अमेरिकेने दिली असली, तरीही थेट ‘नाटो’ विरुद्ध लढाई नको यासाठी इतके दिवस अमेरिकेने लांब पल्याच्या क्षेपणास्त्र वापराची परवानगी दिली नव्हती.
मात्र, अचानक ही परवानगी दि. 15 नोव्हेंबर रोजी बायडन प्रशासनाने युक्रेनला दिली. त्यामुळे रशियाविरोधात त्याचा वापर युक्रेनद्वारे करण्यात आला. अमेरिकेच्या या परवानगीमुळे आता युक्रेन रशियाच्या भूमीवर त्यांच्या भूमीवरूनच आक्रमण करुन लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या जागांना लक्ष्य करु शकतो. तसेच आज युक्रेनने अमेरिकेची क्षेपणास्त्रे वापरल्याने भविष्यात कदाचित ब्रिटन आणि फ्रान्सदेखील अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे युक्रेनला देऊ शकतो. त्यामुळे युक्रेनच्या मारक क्षमतेत जरी वाढ होणार असली, तरी रशियाकडील अस्त्रसाठ्याचा विचार केल्यास भीषण युद्धाकडे जग जाण्याचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे.
2020 साली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अणवस्त्र वापराच्या धोरणांमध्ये बदल केला होता. मात्र, दि. 15 नोव्हेंबर रोजी अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची परवानगी दिल्यानंतर पुतीन यांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी नव्याने अण्वस्त्र धोरणाला मंजुरी दिली. त्यानुसार आता रशियावर कोणताही झालेला हल्ला हा अण्वस्त्र हल्ल्याचा भाग म्हणून पाहिला जाईल. त्यामुळे साहजिकच त्याला उत्तर म्हणून रशिया अण्वस्त्राचा वापर करु शकतो. तसेच पुतीन स्वत: या हल्ल्याचे आदेश देऊ शकतो. मात्र, असे असले तरीही निव्वळ अंतिम पर्याय म्हणूनच त्याचा वापर करणे बंधनकारक असल्याचे रशियाच्या या नवीन अण्वस्त्र धोरणामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
यावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरु असून बायडन प्रशासनाचा हा निर्णय मोठ्या वादग्रस्त ठरणार आहे. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यावर लगेच युक्रेन युद्ध बंद करून दाखवण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाला असला, तरी प्रत्यक्ष सत्तेची सूत्रे सांभाळायला ट्रम्प यांना अजून किमान दोन महिन्यांचा अवधी आहे. याकाळात सत्तेच्या चाव्या बायडन प्रशासनाकडे असल्याचा फायदा घेत ट्रम्प यांच्या वाटेत आधीपासूनच काटे पसरावयला सुरुवात केली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या निर्णयाची कल्पना बायडन यांना नसून, डेमोकॅ्रटिक पक्षातील बराक ओबामा कंपूने परस्पर घेतल्याचे आखाडेदेखील समाजमाध्यमांवर बांधले जात आहेत. तूर्तास बायडन यांचे प्रशासनातील स्थान आणि वचक पाहता, बायडन यांचे नाव वापरून कोणताही निर्णय घेणे या ओबामा कंपूला अशक्य नाहीच. या सर्वांवर ट्रम्प यांनी टीका करताना आगीत तेल ओतण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका बायडन प्रशासनावर केली आहे. तसेच, असे अविवेकी निर्णय घेऊन बायडन प्रशासन तिसर्‍या महायुद्धाकडे जगाला ढकलत असल्याची टीका ट्रम्प ज्युनियर यांनी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना ट्रम्प यांनी रशिया हा काही अमेरिकेचा कायमस्वरुपी शत्रू नसून ‘डीप स्टेट’च खरी शत्रू असल्याच्या आशयाचे विधान केले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयामुळे जागतिक परिस्थिती निवळेल, अशी भाबडी आशा अनेक देशांना होती. मात्र, बायडन प्रशासनाच्या या निर्णयाने ट्रम्प यांना आता अधिकचे कष्ट करावे लागणार आहेत, हे निश्चित. अर्थात, आजवर संयम पाळलेल्या आणि भारताने सांगितल्यानुसार अण्वस्त्रांचा वापर टाळलेल्या पुतीन यांनी अजून दोन महिने संयम पाळल्यास स्थिती पूर्ववत होण्याची भाबडी आशा आहेच. मात्र, ट्रम्प यांना सत्तेत आल्यावर वाटेतले काटे वेचितच मार्गक्रमण करावे लागणार आहे हे निश्चित!
कौस्तुभ वीरकर
Powered By Sangraha 9.0