संवादिनीचा सूरसाधक

20 Nov 2024 22:55:14

Sanjay Prabhakar Dasakkar
 
संवादिनी (हार्मोनियम) वादनाला संगीताची साधना मानणारे, दसककर घराण्यातील एक अनोखे रत्न संजय प्रभाकर दसककर यांच्याविषयी... (Sanjay Dasakkar)
 
साधारण १९५८ सालच्या दरम्यान नाशिकमधील विजयानंद टॉकीजच्या शेजारी मोहनलाल मिस्त्री नावाच्या एका कुशल वाद्यतंत्रकाराच्या दुकानात संवादिनी निर्मिती आणि दुरुस्तीची कामे चालायची. त्यांच्याकडे नाशिकचे सुविख्यात गायक व संवादिनी वादक कै. आदरणीय पंडित प्रभाकर दसककर म्हणजेच दादा या कामात मदत करण्यासाठी जात असत. काही वर्षे अविरत सेवा केल्यानंतर मोहनलाल यांनी दादांवरील प्रेमामुळे ते क्लिष्ट तंत्र दादांना शिकवले. दादांनीदेखील ते तंत्र लवकरच आत्मसात केले. मोहनलाल यांच्या अखेरच्या काळात त्यांना कोणी वारस नसल्याने त्यांच्याकडे निष्ठेने शिकणार्‍या दादांना दुकानातील संवादिनी निर्मिती, दुरुस्तीसाठी आवश्यक ते साहित्य आणि हत्यारे देऊ केली. दादांनीही त्यांचा आशीर्वाद समजून ती घरी आणली आणि घरीच दुरुस्ती सुरू केली. पुढे त्यांनी नानांच्या म्हणजे त्यांचे वडील ह. भ. प. गोविंद शास्त्री दसककर यांच्या सांगण्यावरून भद्रकाली मंदिराजवळ एक दुकान भाड्याने घेऊन तेथे संवादिनी दुरुस्तीचे काम काही प्रमाणात सुरू ठेवले. दादांचे सर्वात मोठे चिरंजीव रघुनाथ लहानपणी शाळा सुटली की, तेथे आवडीने जात व दादांच्या हाताखाली छोट्या-मोठ्या कामांमध्ये हातभार लावत. पुढे काही वर्षांतच दादा संगीत क्लासेसमधून अनेक विद्यार्थ्यांना संगीत विद्यार्जन करू लागल्याने व्यस्त झाले. त्यामुळे दुकान बंद करून त्यांच्या वाड्यातच त्यांनी तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू केले. शिक्षणाबरोबर या कामात रघुनाथ तयार होऊ लागले आणि संवादिनी दुरुस्तीचे काम करू लागले. या कामात त्यांनी धाकटे भाऊ संजय दसककर यांनाही तयार केले.
 
नाशिकमध्ये बालपण गेलेल्या संजय प्रभाकर दसककर यांचा जन्म १९६१ सालचा. एकत्र कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. शालेय जीवन ‘रुंग्ठा हायस्कूल’मधून पूर्ण केले, तर नाशिकच्या ‘बीवायके कॉलेजा’त महाविद्यालयीन शिक्षण झाले. संजय नुकतेच वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले होते. यावेळी संजय यांना या कामाची खूप गोडी लागली. संजय यांच्याकडे कमालीची चिकाटी, जिद्द, मेहनतीची तयारी असल्याने हार्मोनियम निर्मिती आणि दुरुस्तीचे तंत्र त्यांनी अतिशय कुशलपणे आत्मसात केले. सुबक भाते बनवणे, पट्ट्या तयार करणे, योग्य लाकडाची निवड करून रंधा मारून आकर्षक साचा तयार करणे, यासाठी पोषक आणि वेळ वाचवणारे वेगवेगळे डिझाइन्सचे फिक्चर्स तयार करणे, या कामांमध्ये ते आपल्या मोठ्या भावाच्या मदतीने कुशल होऊ लागले. नवनवीन मशीन्स असो, उपयुक्त सामग्री असो यांचा मेळ साधून उत्तरोत्तर संवादिनी निर्मिती आणि दुरुस्तीच्या कामात त्यांनी आजवर अधिकाधिक नैपुण्य मिळवले. या सगळ्याचे फलित म्हणजे, संपूर्ण हार्मोनियम तयार करण्याचे कार्य सुरू झाले. हळूहळू अनेक कीर्तनकारांच्या, कलाकारांच्या, भजनी मंडळांच्या संवादिनी दुरुस्तीसाठी संजयजींकडे येऊ लागल्या.


Sanjay Dasakkar Harmonium
 
या सगळ्या प्रवासाबद्दल बोलताना संजय म्हणतात, “संवादिनीमध्ये तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. हवा फिटिंग, ट्युनिंग आणि टचिंग. ‘हार्मोनियम ट्युनिंग’ ही गोष्ट जणू संवादिनीचा प्राण आहे. त्याचे तंत्र मला दादांनी शिकवले आणि अनेक गोष्टी मला अण्णाने, मोठ्या भावाने शिकवल्या. या सगळ्या प्रवासाकडे मी एक व्यवसाय म्हणून कधी बघितले नाही, की त्याला फक्त व्यवहारिक नजरेतून बघितले नाही.”
 
पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजांनी एकदा परदेशात जाण्यासाठी वजनाला हलकी, आकाराने लहान, बोलकी आणि उत्कृष्ट दर्जाची संवादिनी बनवून द्या, असे सांगितले. त्यांना अपेक्षित अशी सुंदर संवादिनी संजय यांनी त्यावेळी बनवून दिली. ती त्यांना फार आवडली. त्या हार्मोनियमचे त्यांनी विशेष कौतुक केले व आशीर्वाद दिले. संजय यांच्या या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. मीरा यांची अतिशय मोलाची साथ लाभली. तसेच त्यांचे बंधू रघुनाथ व माधव, त्यांच्या वहिनी सौ. उषा व सौ. सीमा यांनीदेखील त्यांच्या कामात नेहमीच मदत केली. संजय यांचे धाकटे बंधू आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संवादिनी वादक पंडित सुभाष दसककर यांनी भारतभर जवळपास सर्व संगीत महोत्सवांमध्ये तसेच परदेशात अनेक कलाकारांसोबत संजय यांनी बनवलेली संवादिनी वाजवली आहे. हार्मोनियम वादनासाठी संजय यांना सुवर्ण पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. तबल्यावर तर त्यांचे विशेष प्रेम. पण, हार्मोनियम हे त्यांच्यासाठी श्रद्धास्थान.


Sanjay Dasakkar Harmonium
 
त्यांनी आजवर अनेक गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना विनामूल्य संवादिनी दुरुस्त करून दिले, तर काहीवेळा गरज वाटल्यास कोणताही मोबदला न घेता संवादिनी देऊ सुद्धा केले. त्यांच्या या दिलदार वृत्तीचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या कन्या कल्याणी तत्त्ववादी व गौरी अपस्तंब या आघाडीच्या युवा गायिका असून, अनेक पुरस्कार त्यांनाही प्राप्त झाले आहेत. जावई सारंग व ओमकार इंजिनिअर असून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पण, उत्कृष्ट तबलावादकही आहेत. कन्या कल्याणी आणि गौरी संजयजींचा वारसा पुढे सांभाळतील, यात शंका नाही.
 
असे हे दसककर कुटुंब म्हणजे संगीत क्षेत्रात नावाजलेले घराणे. या घराण्यात संजय हे एक अनोखे रत्न आहे. हार्मोनियम बनवण्याची त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून जोपासली. अशा या संवादिनीसाठी जीवन समर्पित केलेल्या संजय दसककर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसीठी अनेक शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0