आपत्ती व्यवस्थापनात भारत आघाडीवर! जी २० परिषदेत नोंदवला सहभाग
02 Nov 2024 12:54:53
नवी दिल्ली : पंतप्रधनांचे सचिव पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली, भारतातील उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळाने ब्राझीलच्या जी २० डीसास्टर रिस्क रिडक्षन ग्रुप मध्ये आपला सहभाग नोंदवला. ब्राझीलच्या बेलेम येथे ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पर्यंत ही बैठक पार पडली.
भारताच्या सहभागामुळे डीसास्टर रिस्क रिडक्षन ग्रुपच्या पहिल्या जाहीरनाम्याला अंतिम रूप मिळाले. वेगवेगळ्या सत्रांमध्ये पी.के. मिश्रा यांनी भारताने आपत्ती व्यवस्थापनात केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला. पूर्व चेतवणी प्रणाली, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा, डीआरआर फायनान्स, पुनर्प्राप्ती आणि निसर्ग आधारित उपयोजना या पाच सूत्रांवर आधारित भारताची कार्यप्रणाली जगासमोर ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे अस्तित्वात आलेली जागतिक संस्था - कोएलीशन फॉर डीसास्टर रेसिलीयंस इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI) या संस्थेत आता तब्बल ४० देश आणि ७ जागतिक संस्था सहभागी आहेत.
भारतीय शिष्टमंडळाने ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या मंत्र्यांसमवेत बैठकीत भाग घेतला. त्याच बरोबर, भारताने ब्राझील, जपान, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, जर्मनी या देशातील मंत्र्यांशी आणि आमंत्रित आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. जागतिक पातळीवर भारताचा सहभाग आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात असलेली त्याची वचनबद्धता अधोरेखित करतो.