सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार !

19 Nov 2024 21:11:48

indian railway



मुंबई, दि.१९ : प्रतिनिधी 
सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवासाकडे कल वाढतो आहे. हे पाहता प्रवाशांना वेळेत तिकीट उपलब्ध व्हावे आणि रेल्वे प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत विविध गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे (GS) सुमारे सहाशे नवीन अतिरिक्त डबे जोडले आहेत. एवढेच नाही तर चालू नोव्हेंबरच्या अखेरीस सुमारे ३७० नियमित गाड्यांमध्ये असे एक हजाराहून अधिक सामान्य श्रेणीचे डबे जोडले जाणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. रेल्वेच्या ताफ्यात हे नवीन डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होईल असा अंदाज आहे. यसोबतच, येत्या दोन वर्षात रेल्वेच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नॉन-एसी क्लासचे डबे जोडण्यात येतील.

रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सामान्य वर्गातील प्रवासी हे रेल्वेच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहेत. या श्रेणीतील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. याअंतर्गत जुलै ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत गाड्यांमध्ये जनरल श्रेणीचे एकूण १००० नवीन कोच जोडले जातील. या डब्यांच्या समावेशामुळे दररोज सुमारे एक लाख अतिरिक्त प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

पुढे कुमार यांनी माहिती दिली की, येत्या दोन वर्षांत अशा १० हजारांहून अधिक बिगर वातानुकूलित सामान्य श्रेणीचे जीएस डबे रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट केले जातील. यातील सहा हजारांहून अधिक जीएस कोच असतील, तर उर्वरित डबे स्लीपर क्लासचे असतील. एवढ्या मोठ्या संख्येने नॉन-एसी डब्यांच्या समावेशामुळे सामान्य वर्गातील सुमारे आठ लाख अतिरिक्त प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करू शकतील.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, मध्य रेल्वे ४२ गाड्यांमध्ये ९० अतिरिक्त जनरल डबे जोडणार आहे. याचा दररोज ९००० हून अधिक प्रवाशांना फायदा होणार आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0