‘पार्क’चा पॉक्सो कायदा, २०१२ विषयी सविस्तर अहवाल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना सादर

कायद्यातील तरतुदींविषयी जनजागृतीसाठी समाजात व्यापक अभियान ‘पार्क’ राबवणार

    19-Nov-2024
Total Views |
Adv. Ujjwal Nikam

मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’द्वारा संचालित ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) तर्फे नुकताच तयार करण्यात आलेला पॉक्सो कायदा, २०१२च्या ( POCSO Act ) सद्यस्थिती आणि आवश्यक जनजागृतीविषयीचा सविस्तर अहवाल ‘पद्मश्री’ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना आज पार्कचे संस्थापक-संचालक किरण शेलार यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सादर केला. यावेळी पार्कच्या मुग्धा महाबळ-वहाळकर, अ‍ॅड. नियती शेंडगे आदी उपस्थित होत्या. ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ अर्थात पॉक्सो कायद्याबाबत आज समाजात असलेल्या जागृतीबाबत सद्यस्थिती विस्तृतपणे मांडणारा हा अहवाल आहे. या अहवालाकरिता पार्कच्या अहवाल समितीने पुणे जिल्ह्यात एकूण ११ हजार, ३६६ व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे.

या अभ्यासातून हाती आलेल्या माहितीवर अहवाल समितीने तपशीलवार अभ्यास करून व्यापक अहवालाची निर्मिती केली आहे. ‘पार्क’च्या या अहवालातील सर्वेक्षणानुसार तब्बल ७२ टक्क्यांहून अधिक व्यक्ती या पॉक्सो कायद्याविषयी अनभिज्ञ होत्या. उर्वरित ज्या २८ टक्के व्यक्तींनी या कायद्याविषयी माहिती असल्याचा दावा केला. त्या व्यक्तीही या कायद्यातील तरतुदींविषयी मोठ्या प्रमाणात अनभिज्ञ होत्या. या महत्त्वपूर्ण कायद्यातील तरतुदींविषयी समाजाच्या विविध घटकांत जनजागृतीकरिता व्यापक अभियान राबवण्याची गरज या निष्कर्षांतून अधोरेखित होते. संबंधित अहवालावर आधारित ‘जनजागृती अभियान’द्वारे आज समाजात निश्चितच एक सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे पुढील काळात समाजातील विविध घटकांशी, त्यातील धुरीणांशी संवाद साधून आपल्या समाजातील बालकांचे लैंगिक गुन्हांपासून संरक्षण करण्याकरिता या कायद्याविषयी लवकरच एक व्यापक ‘जनजागृती अभियान’ राबवण्याचा मनोदय ‘पार्क’ने व्यक्त केला आहे.