एका कुटुंबाची तडफड...

    19-Nov-2024
Total Views |

thackeray
 
महाराष्ट्रात जर पुन्हा मविआचे सरकार आले, तर काय होईल, याचे संकेत स्पष्ट उद्धव-आदित्य ठाकरे या पितापुत्रांच्या जोडगोळीने आपल्या प्रचारादरम्यानच्या भाषणांतून दिले. विरोधकांवर सूडबुद्धीने कारवायांच्या धमक्यांपासून ते त्यांना बर्फाच्या लादीवर लोळवण्यापर्यंतचे हे क्रूर, विद्ध्वंसक विचार या कुटुंबाच्या सत्तेसाठीच्या तडफडीचीचेच द्योतक!
 
सत्तेत आलो तर विरोधकांना आम्ही बर्फाच्या लादीवर झोपवणार आहोत,” असा इशारा नुकताच आदित्य ठाकरे यांनी दिला. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शंभूराजे देसाई यांना तुरुंगात डांबण्याचीच भाषा वापरली. त्यामुळे मविआचे सरकार सत्तेत आले तर, सूडाच्या राजकारणाची ठाकरेंची कुप्रथा यापुढेही कायम राहील, असेच स्पष्ट संकेत ठाकरे आणि कंपनीने दिले आहेत. मविआ सरकार जेव्हा राज्यातील जनतेवर लादले गेले, तेव्हा मविआचे सूडाचे राजकारण संपूर्ण राज्याने पाहिले. अनंत करमुसे याला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर झालेली मारहाण असेल, वा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी निवृत्त नौसैनिकाचा फोडलेला चेहरा असेल. पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना ‘सोनिया सेना’ असे संबोधले म्हणून एखाद्या अतिरेक्यासारखे त्याला सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात अटक करून, तुरुंगात डांबणे असेल, वा कंगना राणावत हिने एकेरी उल्लेख केला म्हणून तिच्या घरावर जेसीबी फिरवणे असेल... राज्याला उद्धव आणि कंपनीची गुंडगिरी चांगलीच परिचयाची. आदित्यने वडिलांच्याही पुढे जात नारायण राणे यांना बर्फाच्या गादीवर झोपवण्याची दिलेली धमकी ही तर त्यांच्या स्वभावाला साजेशी अशीच. याच नारायण राणे यांना ठाकरे सरकारच्या पोलिसांनी जेवणाच्या ताटावरून उचलून नेलेले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. म्हणजेच मविआ सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातही ठाकरे पितापुत्र हीच खुनशी राजकारणाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे संकेत त्यांनी मतदान होण्यापूर्वीच दिले आहेत.
 
२०१९ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी जनादेशाचा अव्हेर करत, स्वतःचा शपथविधी करवून घेतला. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे पाय धरले. “सत्तेसाठी मला काँग्रेसच्या दारात जावे लागणार असेल, तर त्यादिवशी मी माझे दुकान बंद केले असेल,” असे तेजस्वी उद्गार ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते, त्याच बाळासाहेबांच्या या सुपुत्राने स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सोनिया-राहुल यांच्यासमोर लोटांगण घातले, याची नोंद इतिहासात झाली आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यासाठी कोणतीही ठोस योजना सादर न करता, युती सरकारच्या सगळ्या योजनांना स्थगिती देणारे सरकार अशीही नकोशी नोंद ठाकरे यांच्या नावावर झाली. ‘कोमट सल्ले देणारा आणि टोमणे मारणारा ब्रह्मांडातील बेस्ट सीएम’ म्हणून आता ते महाराष्ट्राला परिचित. अनुभवी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून स्वत:च्या पुत्रालाच मंत्रिपद देणारे ते आदर्श पिता ठरले. नवनीत राणा यांच्या सभेत शनिवारीच ठाकरेंच्या हस्तकांनी घातलेला धुडगूस तर त्यांची कार्यपद्धती स्पष्ट करणारा ठरला आहे.
 
तशातच आदित्य ठाकरे यांनी छोट्या तोंडी मोठा घास घेत नाहक राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. तसेच गेल्या दोन वर्षांतील महायुतीच्या काळात संघाला काय मिळाले, हे त्यांनी सांगावे, असा स्वभावाला अनुसरून पोरकट प्रश्न त्यांनी केला. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही निस्वार्थी विचारांची संघटना आहे, हे आदित्य यांनी समजून घ्यावे. संघाने कधीही उद्धव ठाकरे यांच्यासारख्या वैचारिक तडजोडी केलेल्या नाहीत. सत्ता मिळावी म्हणून उद्धव आणि कंपनीने बाळासाहेबांचा उल्लेखही ‘हिंदुूहृदयसम्राट’ असा करणे टाळले, हेही विसरता येत नाही. शिवसेनेचा हिंदुत्व हा आत्मा होता. तथापि, उद्धव यांनी हिंदुत्वाला दिलेली तिलांजली ही मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी अत्यंत आवश्यक होती. त्यासाठी त्यांनी हिरवे फलकही लावले. भाजपच्या प्रखर, राष्ट्रवादी विचारांना ‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व’ असे हिणवत आम्ही हिंदुत्व सोडले नाही, असे तोंडाने म्हणत त्यांनी केवळ आणि केवळ मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याचेच उद्योग केले. म्हणूनच, ‘मातोश्री’च्या अंगणात मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार्‍या कसाबला फासावर चढवणार्‍या अ‍ॅड उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. तेथील एकगठ्ठा मुस्लीम मते ठाकरेंच्या मविआला मिळाली.
 
सत्ता कोणाचीही असो, संघाचे काम सुरू असते. गेली १०० वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निस्वार्थीपणे देशहिताची कामे करत आहे. केंद्रात कोणाची सत्ता आहे, यावर संघाचे काम कधीही अवलंबून नव्हते आणि राहणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सत्तेसाठी वाटेल ते असे धोरण अवलंबणार्‍या स्वार्थी, संकुचित वृत्तीच्या नेत्याला ते कसे समजणार? ज्या काँग्रेसचे कौतुक करायला आज उद्धव थकतही नाहीत, त्या काँग्रेसने बाळासाहेबांना किती त्रास दिला, त्यांचा किती अवमान केला, हे जनता विसरलेली नाही. बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क हिरावणे असेल, त्यांच्या अटकेचा भुजबळ यांच्यामार्फत केलेला प्रयत्न असेल, अशी बाळासाहेबांची कोंडी करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. काँग्रेसच्या मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी लांगूलचालनाला विरोध करणारे बाळासाहेब हे पहिलेच होते. म्हणूनच, त्यांना ‘शिवसेनेची काँग्रेस’ व्हायला नको होती. धर्मांध मुस्लिमांना त्यांनी थेट विरोध केला, व्यासपीठावरून जाहीरपणे संबोधत टीका केली. त्यांना प्रसंगी ललकारले, अंगावर घेतले. भगव्या सेनेला हिरवे करण्याचे पाप जसे उद्धव यांचेच आहे, तसेच भगव्या जरीपटक्याचा त्यांनी मागे ‘फडके’ म्हणून केलेला अवमान कधीही विसरता न येणारा! तथापि, उद्धव यांचा सगळा जीव हा सत्तेत गुंतलेला आहे. सत्ता ही ठाकरेंसाठी तिजोरी भरण्याची कोंबडी असून, त्यासाठीच त्यांना आपल्या हातात सत्ता हवी आहे. म्हणूनच, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, ही त्यांची आग्रही मागणी होती. ती अर्थातच शरद पवार यांनी धुडकावून लावली. ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री हे साधेसरळ सूत्र त्यांनी सांगून टाकले.
 
मुंबई मनपातही सत्तेसाठीचा ठाकरेंना असाच हव्यास जडलेला. सत्तेचा विधायक कार्यासाठी, लोकहितासाठी वापर करणे त्यांना माहीत नाहीच. हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर करत, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ कशी निभावायची, याकडेच उद्धव यांचा भर. म्हणूनच, कोरोना महामारीच्या काळात मृतदेहांच्या बॅगांमध्येही भ्रष्टाचार झाला. मृतांच्या टाळूवरचे लोणीही त्यांनी ओरबाडून खाल्ले. सत्तेचा वापर जनकल्याणाऐवजी विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठीच केला गेला आणि आताही त्यांना तेच करायचे आहे. उद्धव आणि कंपनीने संपूर्ण प्रचारातील आपल्या भाषणांमधून तेच संकेत दिले. ‘महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख’ म्हणून सध्या आव आणणारे महाराष्ट्रातील कुटुंबेच ‘उद्ध्व’स्त करण्याची विखारी भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे अशी ही प्रकाश देणारी नव्हे, तर सत्तास्वार्थासाठी वाट्टेल ते पेटवायची खुमखुमी असलेली ‘मशाल’ सत्तेत आली, तर अवघा महाराष्ट्र पुन्हा सूडाग्नीत खाक झाल्यावाचून राहणार नाही, हेच खरे!