ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सर्व राजकीय पक्षांनी बाईक रॅली ( Bike Rally ) काढून केली. ठाण्यातील चार बालेकिल्ले सर करण्यासाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी महायुती आणि मविआमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे पाहावयास मिळाले. बाईक रॅलीसाठी उभय युती-आघाडीच्या उमेदवारांनी जातीने हजर राहून दुचाकीवर स्वार होत मतदारांना आवाहन केले. बाईक रॅलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती मोटारीत बसून सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या बाईक रॅलीमुळे सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या संजय केळकर यांनी रविवारची सुट्टी सत्कारणी लावत भाजयुमोतर्फे १ हजार, ५०० बाईकस्वारांची रॅली काढली. तर सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी केळकरांनी पायी वारी काढत व्यापारी व नागरिकांची भेट घेतली. तर, महायुतीतील शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यादेखील सहभागी झाल्या होत्या.
ओवळा-माजिवड्यातील प्रताप सरनाईक यांनी तसेच मुंब्रा-कळव्यातील राष्ट्रवादी महायुतीच्या नजीब मुल्ला यांनी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. तर, मविआ आघाडीतील उबाठा गटाचे राजन विचारे, नरेश मणेरा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे अविनाश जाधव यांनी बाईकवर स्वार होत हजारो दुचाकीस्वारांच्या उपस्थितीत रॅली काढली. सर्वच उमेदवारांच्या बाईक रॅली दुपारच्या सत्रात रस्त्यावर अवतरल्याने एकप्रकारे चुरस रंगून शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.