मुंबई : कांदिवली पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी दि. २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा फॉर्म भरण्यासोबतच प्रचाराला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कांदिवलीत प्रचाराचा झंजावात उभा केला. दि. २४ ऑक्टोबर रोजीपासून ते सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजीपर्यंत त्यांनी कांदिवलीत १६ हून रथयात्रा, २० हून पदयात्रा, असंख्य स्थानिक भेटी आणि संवाद, तीन जाहीर सभा, खुल्या चर्चा अशा सर्व माध्यमांतून प्रचार केला.
दरम्यान, भोजपुरीचे सुपरस्टार मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव उर्फ निराहुआ सौराष्ट्राचे कविराज लोकसाहित्यकार राजबा गढवी यांनी कांदिवलीत अतुल भातखळकरांच्या समर्थात प्रचार केला. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खा. पीयूष गोयल यांनीदेखील अतुल भातखळकरांच्या समर्थानात प्रचार रॅली आणि व्हिडीओ मॅसेजच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले.
सोमवार, दि १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अतुल भातखळकरांसाठी आयोजित ‘भव्य विजय संकल्प’ रॅलीत (बाईक रॅली) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही सहभाग घेतला होता. भाजपचे विधानसभा अध्यक्ष अप्पा बेलवलकर, विधानसभा प्रभारी सुधीर शिंदे, शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विधानसभा समन्वयक एकनाथ शंकर हुंडारे, माजी नगरसेवक शिवकुमार झा, सुनीता यादव, दक्षा पटेल, सुरेखा पाटील, संगीता शर्मा, सागर सिंहसोबतच भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांनी या बाईक रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दरम्यान, अतुल भातखळकरांनी निवडणुकीच्या प्रचारात योगदानासाठी कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आहेत.
यावेळी भातखळकर म्हणाले की, “दहा वर्षांत माझा फोन नंबर बदलला नाही. तसा माझ्यातही कोणता बदल झालेला नाही. मी याआधी जसा लोकांची कामे करत होतो, तसा पुढे पाच वर्षे करत राहणार आहे, असा विश्वास मी तुम्हाला देतो. यासोबतच त्यांनी मतदारांना दि. 20 नोव्हेंबर रोजी न चुकता मतदान करावे,” असे आवाहन केले आहे.