मुंबई, दि.१९ : प्रतिनिधी सर्वसामान्य मुंबईकर आणि भाडयाच्या घरात वास्तव्यास असणाऱ्यांच्या खिश्यावरील घरंभाडे खर्चाचा ताण वाढला चांगलाच वाढला आहे. 'जुलै ते सप्टेंबर २०२४' या तिमाहीत मॅजिकब्रिक्सच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत महिन्याला सरासरी भाडे ८६.५० रुपये प्रति चौरस फूट इतके आकारण्यात येते. जे देशातील सर्वाधिक आहे. यामुळे मुंबईतील वाढत्या घरं भाड्याची समस्या मागील काही महिन्यात आणखी वाढली आहे.
मुंबईसारख्या महागड्या शहरात सर्वसामान्य नागरिक आता उपनगरांकडे जाऊ लागले आहेत. पण ठाणे, नवी मुंबईसारख्या भागातही वाढत्या मागणीमुळे भाडे वाढतच चालले आहे, अशा तक्रारी आता प्रशासन आणि विकासकांसमोर निर्माण झाल्या आहेत. अंधेरीच्या रेखा गुप्ता म्हणतात"या वर्षी आमच्या फ्लॅटचे भाडे पाच हजार रुपयांनी वाढले आहे. मुलांचे शिक्षण आणि घरखर्च यांच्यावर यामुळे ताण वाढतो आहे."
"रेडी-टू-मूव्ह फ्लॅट्सच्या वाढत्या खरेदीमुळे भाड्याने घरांचा पुरवठा कमी होत आहे. तसेच, बाजाराला बांधकामाधीन प्रकल्पांसह समतोल साधण्यास वेळ लागेल," असे मॅजिकब्रिक्सचे मुख्य विपणन अधिकारी प्रसून कुमार यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत हे घरं भाड्याचे दर आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.