मुंबई : जे लोक निघून गेलेत त्यांना उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात. पण तर घरात बसले आहेत. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि अख्ख्या पक्षाची वाट लावली, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपले बंधू उद्धव ठाकरेंवर केली आहे. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरे गेले आहेत. त्या दिवशी वर्षा गायकवाड राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती देत होत्या. पण राहुल गांधींनी त्याकडे बघितले आणि तोंड फिरवले. ज्यांना महाराजांची प्रतिमासुद्धा हातात घेण्याची लाज वाटते त्यांच्याबरोबर हे जाऊन बसले आहेत. मला मुख्यमंत्री करा या स्वत:च्या स्वार्थासाठी ते गेलेत. या एका माणसाने अख्ख्या पक्षाची वाट लावली," अशी टीका त्यांनी केली.
हे वाचलंत का? - निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे चौकशी करावी : विनोद तावडे
ते पुढे म्हणाले की, "जे लोक निघून गेलेत त्यांना हे गद्दार म्हणतात. पण गद्दार तर घरात बसले आहेत. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. या माणसाच्या वागणुकीमुळे आधी राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो आणि त्यानंतर शिंदे बाहेर पडलेत. पण बाळासाहेबांना त्रास देऊन बाहेर गेलेला पहिला माणूस छगन भुजबळ होते. त्यांना उद्धव ठाकरे मातोश्रीवर जेवायला बोलावतात. बाळासाहेबांच्या त्रासाबद्दल त्यांना काहीही देणंघेणं नाही. बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टीकोन बघा. गेल्या पाच वर्षात काय झालं, हा माणूस कसा वागला, या सगळ्या गोष्टी आठवा आणि २० तारखेला मतदान करा," असे आवाहनही राज ठाकरेंनी केले.