विनोद तावडेंवर आरोप करून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न!
प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
19-Nov-2024
Total Views |
मुंबई : विनोद तावडेंवर करण्यात आलेला आरोप हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. बहुजन विकास आघाडीकडून विरार येथे विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून मोठा राडाही झाला. त्यानंतर आता यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
प्रविण दरेकर म्हणाले की, "विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो हा आरोप हास्यास्पद आहे. विरोधकांना उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत खोटा नरेटीव्ह सेट करून विरोधकांनी विजय मिळवला. आता या निवडणुकीतही त्यांनी सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्ष किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नरेटीव्ह चुकीचे आहेत, हे सांगण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही जनतेला विकासाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारने काय केले हे सांगितले. भविष्यात आमचे सरकार आल्यावर आम्ही काय करणार आणि महाराष्ट्राची प्रगती कशी होणार, हेदेखील आम्ही सांगितले. महाराष्ट्रात आम्ही दिलेल्या लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी कर्जमाफी, वीजबिल कर्जमाफी अशा अनेक योजना मतदारांना प्रभावित करणाऱ्या आणि विश्वास देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे या योजनांना विरोधकांनी विरोध केला. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात सुरु केलेले प्रकल्प स्थगित करण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या स्थगिती सरकारने केले. परंतू, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रगती आणि गती घेतली आहे," असे ते म्हणाले.
"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात महायुतीचे सरकार आहे. तसे चित्रही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे काल अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली. दगड मारून कुणाला रक्तबंबाळ करणे ही आमची संस्कृती नाही. दगड कुणी मारले हे चौकशीतून बाहेर येईल. वसई नालासोपाऱ्याला झालेला प्रकार हा तसाच आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे उरलेल्या एक-दोन दिवसात आपल्याला काही करता येते का? महाराष्ट्रातले वातावरण संभ्रमित करून निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या बाजूने वळवता येते का? असा केविलवाणा प्रयत्न सूरु आहे," असेही दरेकर म्हणाले.