अमरावती : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप अडसड यांच्या बहिण अर्चना रोठे या प्रचार करुन गाडीतून परतत होत्या. दरम्यान, सातेफळ फाट्याजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे वाचलंत का? - अनिल देशमुखांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला! सगळ्या गोष्टी संशयास्पद
तसेच हल्लोखोरांनी त्यांच्या काच फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर अंधारात पसार झाले. हे हल्लेखोर कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अर्चना रोठे यांची रुग्णालयात भेट घेतली.