नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session ) पूर्वसंध्येस २४ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अधिवेशनापूर्वी प्रथेप्रमाणे केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी त्याची माहिती दिली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान सभागृहाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार वक्फ दुरुस्ती विधेयक मांडून ते मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या वक्फ दुरुस्ती विधेयक सभागृहाच्या संयुक्त समितीकडे आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनासाठी सरकार आणि विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.