नागपूर : अनिल देशमुखांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असून या घटनेतील सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, असा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यावर परिणय फुकेंनी प्रतिक्रिया दिली.
परिणय फुके म्हणाले की, "या घटनेचे सगळे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आले आहे. त्यामुळे मी सतत काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील अनेक सभांमधून मी काटोलच्या जनतेला सतर्क करत होतो. या प्रकारे एक खोटे नाटक किंवा फेक दगडफेक होणार असल्याचे भाकीत मी माझ्या भाषणांमध्ये केले होते. आता तशीच एक फेक दगडफेक करण्यात आली आहे."
हे वाचलंत का? - माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वाहनावर हल्ला!
"या घटनेचे फोटो बघितल्यास जवळपास १० किलोचा दगड देशमुखांच्या गाडीच्या काचेवर पडला आहे. हा १० किलोचा दगड कुणी दहा फुटावरूनसुद्धा फेकून मारु शकत नाही. दगडफेक करताना कोणत्या प्रकारचे दगड वापरले जातात हे काटोलच्या सामान्य शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यांच्या बोनेटवर एवढा मोठा दगड पडलेला असताना एक साधा स्क्रॅचसुद्धा पडलेला नाही. काच पूर्ण न फुटता फक्त मोठ्या भेगा पडल्या आहेत. अनिल देशमुख हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते आणि त्या सीटच्या खाली एक दगड पडलेला दिसतो आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. या संदर्भातील तपास पोलीस करणारच आहेत. हे अनिलबाबूंचे नाटक आहे," असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "मागच्या २५ वर्षांपासून ते आपल्या काटोलच्या जनतेला मुर्ख बनवण्याचे काम करत आहेत. आपल्या आशीर्वादाच्या भरवश्यावर २५ वर्षांपासून आमदार, मंत्री म्हणून त्यांनी काम केले. पण कोणतेही विकासकाम केले नाही. आज त्यांनी त्यांच्या मुलाला रिंगणात उतरवले. पण त्यांचा मुलगा सलील ही निवडणूक जिंकू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच याप्रकारचा फेक दगडफेकीचा प्रयत्न केला. या माध्यमातून एक सहानुभूती घेण्याचा ते प्रयत्न केला आहे," असेही ते म्हणाले.
५ वर्षांपूर्वी नाना पटोलेंनींही केला होता फेक हल्ला!
"पाच वर्षांपूर्वी साकोली विधानसभेतून लढत असताना नाना पटोलेंनीसुद्धा याच प्रकारे एक फेक हल्ला करून घेतला आणि जनतेसमोर रडून त्यांनी मते मागितली. ते निवडणूकीत जिंकूनही आलेत. परंतू, मागचे पाच वर्ष साकोली विधानसभेतील जनता रडलेली आहे. त्यामुळे आज चुकून कुणी या दगडफेकीला बळी पडल्यास पुढचे पाच काटोलची जनता रडत राहणार आहे," असेही परिणय फुके म्हणाले.