“चित्रपट माध्यमाचा आणि व्यवसायाचा अभ्यास करा” सचिन पिळगावकर यांचा राज्यभरातील निर्मात्यांना सल्ला

18 Nov 2024 18:54:41
 
sp
 
पुणे : ‘कथा हा चित्रपटाचा आधारस्तंभ असतो. तो भक्कम हवा. फक्त पैसे आहेत, म्हणून निर्माते होऊ नका. चित्रपट माध्यमाचा आणि व्यवसायाचा अभ्यास करा." असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनी 'निर्मिती संवाद' कार्यशाळेत राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना दिला. 'मेघराज राजेभोसले फाऊंडेशन' तर्फे १० नोव्हेंबर रोजी पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या संकुलात मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी 'निर्मिती संवाद' या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला सचिन पिळगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत बोलताना पिळगांवकर पुढे म्हणाले, “सिनेमा फ्लॉप होत नाही, तुमचे बजेट फ्लॉप झालेले असते. बजेटवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. शासनानेही निर्मात्यांना आर्थिक साह्य देण्याबरोबर इतरही बाबींसाठी मदत करावी.” कार्यशाळेत राज्याच्या विविध भागांतून ४०० हून अधिक चित्रपट निर्मात्यांचा यात सहभाग होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, संकलक, वितरक, थिएटर मालक, वाहिन्यांचे कार्यकारी अधिकारी, ओटीटी तज्ञ अशा अनेक विषयतज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनीही या कार्यशाळेत विचार मांडले. कथेच्या निवडीपासून ते चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांसह शासकीय अनुदान, टिव्ही चॅनल्स, ओटीटी आणि विविध हक्क विक्रीसंबंधी वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा झाल्या. या कार्यशाळेत सुनील सुकथनकर, किरण यज्ञोपवित, कांचन अधिकारी, शशांक शेंडे, संजय ठुबे, नीलेश नवलाखा, उपेंद्र सिधये, सुरेश देशमाने, राहुल रानडे, संजय दावरा, युगंधर देशपांडे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर, गणेश गारगोटे, फिल्मसिटीचे पंकज चव्हाण, हेमंत गुजराती, संतोष रासकर, किरण रोंगे, गिरीश जांभळीकर, अन्वय कोल्हटकर, शौकत पठाण, शाम मळेकर, सुरेश तळेकर, आदित्य देशमुख, योजना भवाळकर-भावे आदी मान्यवर उपस्थित होते. सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊस आणि उर्विता प्रॉडक्शन्स यांचे सहकार्य या कार्यशाळेला लाभले.
Powered By Sangraha 9.0