निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोठ्या तोर्यात बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना राहुल गांधीच्या मुखातून बाळासाहेबांविषयी दोन शब्द तरी बोलवून दाखवा, या दिलेल्या आव्हानाची पार्श्वभूमी त्याला होती. पण, नको तिथे धाडस केले की, अंगाशी येते अशी अवस्था प्रियांका गांधी यांची झाली आहे. बाळासाहेबांबाबत भाषणात बोलताना प्रियंका गांधी यांनी बाळासाहेब आणि काँग्रेस यांची विचारधारा भले भिन्न असेलही, मात्र दोघांनीही कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन केला नसल्याचे विधान केले. हे विधान म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला दिलेला एक धक्काच होता. कारण, बाळासाहेबांनी कधीच शिवरायांचा अपमान सहन केला नाही, हे मराठी रयतेला माहीत होते, पण काँग्रेसचे काय?
समस्त काँग्रेस जनांना प्रात:स्मरणीय असलेल्या जवाहरलाल नेहरू यांनी, त्यांच्या पुस्तकात शिवछत्रपतींचा केलेला वादग्रस्त उल्लेख म्हणजे प्रियांका गांधी यांना बहुमान वाटतो की काय? कदाचित असेलही. काँग्रेसला असेही जगात सर्वात हुशार, व्यासंगी आणि तज्ज्ञ कोणी वाटत असतील तर ते नेहरुच! त्यामुळे शिवरायांविषयी नेहरूंचे बोल म्हणजे अपमान आहे, असे काँग्रेसला वाटले नसेलच. पण, काँग्रेसला काय वाटते याची चिंता महाराष्ट्र का करेल? नेहरूंनी शिवरायांचा अपमान केला ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनी केलेले वक्तव्य बेतालच आहे. पण, मग एवढे प्रेम बाळासाहेबांविषयी का? तर, काँग्रेस बाळासाहेबांचा सन्मान करत नाही, यामुळे खरा शिवसैनिक दुखवला आहेच. याचा परिणाम मतपेटींवर होऊ शकतो. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखदच चव्हाट्यावर आणली. त्यामुळे बिथरलेल्या काँग्रेसने प्रियांका गांधींना मैदानात उतरवून शिवसैनिकांसमोर बाळासाहेबांविषयीचा खोटा पुळका दाखवण्याचे नाट्य घडवून आणले. पण, यामुळे काँग्रेसचाच मतलबी चेहरा राज्याच्या समोर उघडा पडला आहे. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला, तीच काँग्रेस बाळासाहेबांच्या सन्मानाच्या गोष्टी आज करत आहे. यावरूनच फक्त मतांसाठी काँग्रेस किती खालच्या पातळीवर उतरून वागू शकते हेच पुन्हा सिद्ध झाले आहे.
सुज्ञ जनता
निवडणुकीच्या काळात टीका-टिपण्या, आरोप प्रत्यारोप हे होणे नैसर्गिकच. पण, त्या करताना तारतम्यभाव जपणे आवश्यक असते. मात्र, काही नेत्यांमध्ये त्याचा अभावच दिसून येतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी प्राचाराच्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. त्यात ते असे म्हणाले की, “महाराष्ट्र भिकारी झाला पाहिजे आणि भिकेचा वाडगा घेऊन माझ्यासमोर उभा राहिला पाहिजे, लाचार झाला पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कारस्थान आहे.” उद्धव ठाकरे यांनी कायमच महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण केले आहे. अस्मिता हाच त्यांच्या प्रचाराचा मुख्यबिंदू असतो. त्यासाठी सातत्याने इतिहासातील रुपके वापरून ते समोरच्यावर टीकाही करत असतात. पण, अस्मितेच्या राजकारणाबरोबर विकासाचे राजकारण उद्धव ठाकरे यांनी का नाही केले? हाच प्रश्न आज निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राची जनता त्यांना विचारणार आहे. सातत्याने महाराष्ट्राचे प्रकल्प केंद्र सरकारने महाराष्ट्राबाहेर पळवले असा आरोप करत, हा महाराष्ट्राचा अपमान म्हणायाचा. हळूच त्याला मराठी अस्मितेची फोडणी द्यायची. पण, जेव्हा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ महाराष्ट्राच्या बाहेर गेला, तेव्हा असलेले सरकार हे तुमचेच होते, त्यावेळी का नाही काळजी घेतली? तुमच्याच राजवटीत उद्योगपतींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके मिळतात आणि त्यातील संशयीत आरोपी वाझे यांची तुम्ही वाझे म्हणजे काय लादेन आहे का? असे म्हणता, तेव्हा या तुमच्या उलट्या बोंबा सारे जग बघत असते..
कोणत्याही उद्योगाला आवश्यक वातावरण निर्माण करण्यात त्या शहराची सुरक्षितता व्यापक भूमिका बजावत असते. मात्र, मविआच्या काळात ही सुरक्षितता ना उद्योजकांना वाटली ना सामान्य जनतेला. त्यात मविआ सरकारमध्ये असलेला सामंजस्याचा अभाव. त्यामुळे एकूणच मविआ सरकारची अवस्था ही आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशीच. यामुळेच राज्यातील बहुतांशी प्रकल्पांनी त्यांचा गाशा गुंडाळला. हे पातक केंद्र सरकारचे कसे? ज्यांनी अनेक प्रकल्प दिले, मेट्रोपासून नाणार, बारसू, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर असे अनेक प्रकल्प दिले. तर स्वार्थी राजकारणापायी अनेक प्रकल्प तुमच्याच सरकारने रखडवले, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचा विकास कराल यावर सुज्ञ जनता तरी विश्वास ठेवणार नाही हेच सत्य.
कौस्तुभ वीरकर