निकाल २० तारखेच्या बुधवारी लागणार...

    18-Nov-2024
Total Views |

hockey
 
गेले काही दिवस देशात चर्चा सुरु आहे ती, निकालाचीच. निवडणुकीचा निकाल काय लागणार, अशी चर्चा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुरु असताना, बिहारमध्ये आशियाई महिला चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता टीपेला पोहोचली आहे. बिहारमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
 
दिवाळी संपून काहींचा छटपूजेचा सोहळा पार पडला. तुळशीचे लग्न, अगदी देवदिवाळीदेखील झाली. सगळेच सण झाल्याने, सगळ्यांचीच लगबग आता थांबली आहे. तथापि, काही राज्यात काही जणांची अजूनही धामधूम चालूच असल्याचे दिसत आहे. त्या राज्यात सगळे जण आता एकेक निकाल काय लागत आहेत, त्याकडे लक्ष ठेऊन बसणार आहेत. महाराष्ट्र, झारखंडसारख्या राज्यात तर विधानसभा मतदानाच्या तारखेलाच, कोण जिंकणार व कोण हरणार याचे निकाल लागणार आहेत. ते निकाल जनमत सर्वेक्षण व एक्झिट पोलवर जाहीर केले जातात, तसे तर नक्कीच नसणार आहेत. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या मतांची मोजणी होऊन, दि. २५ तारखेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत आहे. तोपर्यंत महाराष्ट्र, झारखंडसारख्या राज्यात निवडणुकांची धामधूम सध्या चालू आहे, तशीच चालू राहणार आहे. त्या राज्यांच्या बाबतीत त्याच्या निकालांबद्दल आपण एकवेळ समजू शकतो. पण, जानेवारी २०२४ साली बिहारमध्ये नवव्यांदा मुख्यमंत्रीपदावर आरुढ झालेल्या नितीश कुमार यांच्या राजकीय निवडीच्या धामधुमीचा संबंध आता नसावा. कारण, बिहारमधील विधानसभा निवडणुकांना जवळपास अजून एक वर्ष आहे. असे असूनही, बिहारची जनता अटीतटीच्या स्पर्धा आणि त्याचे निकाल याबाबतीत एका वेगळ्याच मूडमध्ये आहेत. या बिहारच्या जनतेबरोबरच फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील सगळेच क्रीडाप्रेमी आणि त्यातही आशियाई हॉकीप्रेमी, वेगळ्याच मूडमध्ये आहेत. या मूडचे वादळ येत आहे, बिहार राज्याच्या पाटण्याजवळील राजगीर या गावातून.
 
महाराष्ट्र, झारखंडसारख्या राज्यात बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी एकीकडे महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमी विधानसभेचे मतदान करत आपला मतदानाचा हक्क सोडणार नाहीत, तसेच ते त्याचदिवशी होणारे हॉकीचे अंतिम सामने अनुभवायला ही विसरणार नाहीत. तिकडे मतपेटीतले निकाल दि. २५ नोव्हेंबर रोजी समजणार असले, तरी ‘आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धे’चे निकाल २० तारखेलाच जाहीर होणार आहेत. राज्यातील राजकीय चॅम्पियन कोण होणार? याचे निकाल दि. २५ नोव्हेंबर रोजी होणार असले, तरी २० तारखेला चॅम्पियन कोण असतील, याचा अंदाज आपल्याला आजच येणार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या हॉकीप्रेमींना पोटभर गोल पाहण्याचे समाधान, या आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेमुळे अनुभवायला मिळत आहे. काहींनी प्रत्यक्षात क्रीडागारात, ज्यांना तिकीटे मिळाली नसल्याने क्रीडागाराच्या बाहेर, भलेमोठे दूरचित्रवाणी संच लावले आहेत त्यावर, तसेच भारतासह जगभर दूरचित्रवाणीवर हे महिलांचे सामने बघत, हॉकीचा आनंद घेत आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सगळ्या सहा देशांची राष्ट्रगीते वाजवण्यात आली होती. बिहारच्या जनतेला त्याचा अनोखा आनंद घेता आला. ’हॉकी का पर्व, बिहार का गर्व’ अशी मनोवेधक जाहिरात करणारी घोषणा करण्यापासून, स्पर्धा जेथे होते आहे त्या राजगीर गावच्या मार्गात सर्वत्र ती जाहिरात लावून, लोकांना त्या स्पर्धेसाठी आकर्षित करण्यात येत आहे. बिहारमध्ये होणारी महिला आशियाई विजेतेपद चषकाची ही पहिली-वहिली आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा ठरली आहे. भारतीय हॉकी महासंघ अर्थात हॉकी इंडिया, आशियाई हॉकी महासंघ, बिहार सरकारचा क्रीडा विभाग यांचा या स्पर्धेच्या म्हणजेच दि. २० नोव्हेंबर रोजीपर्यंतच्या आयोजनात सक्रीय सहभाग असेल. या स्पर्धेत एकूण २० सामने पाहायला मिळणार आहेत. या क्रीडामहोत्सवात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी, धावण्याच्या स्पर्धेसहित मैदानी खेळाचे क्रीडांगण, तसेच फुटबॉलचे आधुनिक मैदान असलेल्या क्रीडागाराचेही उद्घाटन केले. या स्पर्धेला आलेल्या सर्व खेळाडूंची, बोधगया तसेच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राजगीरसारख्या ठिकाणांची, एक छोटेखानी सहल आयोजित करण्यात आली होती.
 
या स्पर्धा ज्या क्रीडासंकुलातील क्रीडागारात होत आहेत, ते संकुल एका मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विश्वविद्यालयाचा एक भाग आहे. हे क्रीडासंकुल हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, पोहणे आणि कुस्ती यासह, जवळपास २५ वेगवेगळ्या खेळांसाठी बनवण्यास येत आहे. यापैकी हॉकी स्टेडियम हे पूर्ण झालेले पहिले स्टेडियम आहे. यामध्ये जवळपास सहा ते आठ हजार प्रेक्षक क्रीडागारात बसू शकतात. पटियाला येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स’च्या धर्तीवर, या संकुलात आणखी बरेच काम चालू आहे. ज्यामध्ये क्रीडा मानसशास्त्र, विविध खेळांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे, क्रीडा विश्वविद्यालयदेखील तेथे असेल.
 
हॉकी इंडियाने या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला हॉकी संघाच्या अ आणि ब संघांमध्ये, एक प्रदर्शनी सामनादेखील तेथे आयोजित केला होता. एक नवा क्रीडा अध्याय बिहारमध्ये लिहिला जात आहे. भारत प्रत्येक राज्यात क्रीडासंस्कृती कशी रुजवत आहे, याचे बिहार हे एक उदाहरण असल्याचे म्हणता येईल.
 
या स्पर्धेच्या सामन्यांच्या वेळा, पूर्वनियोजित वेळांपेक्षा अंधार पडण्याच्या आधीच घेण्याचे ठरविण्यात आले आहे. स्पर्धा ज्या ठिकाणी होत आहेत, ते ठिकाण भातशेतीने वेढलेले आहे. ज्यामध्ये या हंगामात मोठ्या प्रमाणात कीटक असतात. त्याच्या जवळच्या मैदानात दिवेलागणीच्या सुमारास जर स्पर्धा झाल्या, तर त्यासाठी फ्लड लाईट लावणे क्रमप्राप्त होते. सगळे कीडे तेथे घोंघवायला लागतात व त्या कीटकांच्या प्रादुर्भावामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी, विशेषतः जेव्हा फ्लड लाईट चालू असतात, अशी वेळ बदलण्यात आली आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले की, बिहार सरकारने इष्टतम खेळाची परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी, प्रगत ड्रोन ऑपरेशन्स, सघन फ्युमिगेशन प्रोटोकॉल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचारांसह सर्वसमावेशक पर्यावरण व्यवस्थापन असे उपाय कार्यक्रमस्थळी सक्रियपणे लागू केले आहेत. ते म्हणाले की, जगभरातील समान परिस्थितीमध्ये प्रोटोकॉलचा वापर करून, स्टेडियम संकुलामध्ये आणि आजूबाजूला इतर थंड फवार्‍यांसह , सायफेनोथ्रिन, डेल्टामेथ्रिन आणि सायफ्लुथ्रिनसारखी सात प्रकारची रसायने वापरली गेली आहेत. या स्पर्धेदरम्यान दररोज तीन सामने खेळवले जात आहेत.
‘लॉस एंजिलिस ऑलिम्पिक’चे आयोजन २०२८ साली करण्यात येणार आहे. त्यापूर्वी २०२६ साली ‘विश्वकरंडक’ होणार आहे. या दोन महत्त्वाच्या स्पर्धांची तयारी महिलांची ‘आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धे’द्वारे करण्यासाठी, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे आणि उपकर्णधार नवनीत कौर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने, सोमवार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी मलेशियाविरुद्धच्या मोहिमेने सुरुवात केली आहे. त्या ‘आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धे’चा धावता आढावा आता आपण घेऊ.
 
गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने ‘आशियाई चॅम्पियन करंडक’ स्पर्धेत, सोमवारी मलेशिया संघाचा ४-० असा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. पण, दुसरीकडे चीनच्या संघाने थायलंडच्या संघाविरुद्ध १५-० असा दणदणीत विजय साकारला होता. त्यामुळे सलग दुसर्‍या विजयानंतरही भारतीय महिला हॉकी संघाने, गुणतालिकेत सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. चीनचा संघ दोन विजय आणि सहा गुणांसह अधिक गोलफरकाच्या जोरावर, पहिल्या स्थानावर आरुढ झाला होता. चीन हा या स्पर्धेतील भारताला तोडीस तोड असणारा सर्वोत्कृष्ट संघ आहे. दुसर्‍या सामन्यात दक्षिण कोरियाला पराभूत करताना, भारतीय महिलांना कडवी झुंझ द्यावी होती. त्यानंतरचा विश्रांतीचा दिवस झाल्यानंतर यजमान भारतीय महिला हॉकी संघाची ‘आशियाई चॅम्पियन्स करंडका’तील धडाकेबाज कामगिरी, गुरुवारच्या तिसर्‍या सामन्यातही कायम राहिली. विश्रांतीच्या दिवसानंतर अगदीच एकतर्फी झालेल्या त्या सामन्यात, भारताने थायलंडचा १३-० असा धुव्वा उडवला होता. विशेष म्हणजे, थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सुधारणा करताना, मिळविलेल्या १२ पैकी पाच कॉर्नरवर गोल केले आहेत. भारताचा हा सलग तिसरा विजय जरी ठरला असला तरी, चीन व भारत या दोन्ही संघानी प्रत्येकी नऊ गुणांची कमाई केली होती. मात्र सरस गोलफरकाच्या जोरावर चीनचा संघ परत पहिल्या तर भारत दुसर्‍या स्थानावर राहिला होता. या विजयासह गतविजेते असलेल्या भारताने, दोन सामने शिल्लक असतानाच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. या मोठ्या विजयासह, भारताने गोलफरक १८ असा सुधारला असला तरी, आपण अजूनही चीनच्या (२१) मागे आहोत. भारताचा शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी चीनशीच झालेला सामना महत्त्वाचा होता. त्या सामन्यात भारताने चीनवर विजय मिळवून दाखवला आहे. याआधीच्या थायलंड विरुद्धच्या सामन्यात अजून एक उल्लेखनीय बाब ठरली होती ती म्हणजे, लेलरेमसियामीने या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघासाठी १५० सामने खेळण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. प्रीती दुबे हिने सुद्धा तेव्हा ५० सामने पूर्ण केले.
 
गट टप्प्यात सर्व संघ एकमेकांशी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळले आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेशकर्ते ठरले. साखळी फेरीची चीन विरुद्धची महत्त्वाची लढत दि. १६ नोव्हेंबर रोजी झाली. त्यानंतर साखळीतील अव्वल संघ ठरला. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी, जपान विरुद्ध भारत हा एक गटसाखळी सामना संपल्यानंतर , मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी पाचव्या आणि सहाव्या स्थानाचे वर्गीकरण सामने होतील. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी कांस्यपदकाचा सामना आधी दुपारी होऊन आपण ज्या निकालाची वाट बघत आहोत, त्या अंतिम सामन्याचा निकाल सायंकाळपर्यंत दिवेलागणीच्या आत लागणार आहे.
२०२३ सालची ‘महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी’देखील भारतात रांची, झारखंड येथे खेळवली गेली होती. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय महिला हॉकी संघाने जयपाल सिंग स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात, जपानचा ४-० असा पराभव करून दुसरे महिला ‘आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी विजेतेपद’ पटकावले होते. त्या़क्ळी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना तिसर्‍या स्थानावर होता.
 
भारताने उपांत्य फेरीत चीनविरुद्ध ३-० असा विजय नोंदवत, लीग टेबलमध्ये चार विजयांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. संगीता कुमारी आणि कर्णधार सलीमा टेटे यांनी तिसर्‍या क्वार्टरमध्ये संघासाठी सुरुवातीचे दोन गोल केले, तर दीपिकाने सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला आणखी एक गोल केला आणि भारताने चीनला पराभूत केले. या सामन्याने भारताचे गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले, तर दीपिकानेही गोल-स्कोअरिंगच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. आता या स्पर्धेत तिच्या नावावर आठ गोल झाले आहेत.
 
खचाखच भरलेल्या राजगीर हॉकी मैदानात अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा आपल्या महिलांनी पुरेपूर फायदा घेत, प्रेक्षकांच्या झोळीत चीनविरुद्धचा विजय टाकला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आपली अपराजित घोडदौड कायम ठेवत, भारत आता अंतिम गट साखळी सामन्यात जपानशी सामना खेळेल आणि मग अंतिम फेरीचे सामने चालू होतील. असे हे सामने अनुभवत सारे आता २० तारखेच्या निकालाची वाट बघत आहेत. बिहारमधील पहिल्या हॉकी स्पर्धेतील भारताची नेत्रदीपक कामगिरी बिहारवासियांच्या सतत स्मरणात राहो. तसेच समस्त भारतीय हॉकीप्रेमींना २० तारखेला दिवाळीनंतर, परत एकदा आतिशबाजीचा आनंद घ्यायला मिळो.
 
 
 
श्रीपाद पेंडसे

(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकी पटू आहेत.)
९४२२०३१७०४