अमरावती : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शरद पवार गटाचे नेते सुनील वऱ्हाडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुनील वऱ्हाडे यांनी आपल्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "सुनील वऱ्हाडे हे फक्त स्वत:च्या फायद्यासाठी आमच्याकडे येत असतात. याआधीच्या बँकेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणले. त्यावेळी त्यांनी काही पैशांची मदत मागितली. ती आम्ही केली होती. आता काल-परवा त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि २५ लाख रुपये मागितले. ते म्हणतात की, आम्ही शरद पवार गटाचे आहोत. पण ते कधीही पक्षाचे हिताचे काम करत नाहीत. ते सदैव व्यापारी प्रवृत्तीचे असल्याने कायम ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात," असा आरोप त्यांनी केला आहे.
हे वाचलंत का? - नवनीत राणांच्या सभेत 'अल्लाहू अकबर'चे नारे!
यावर शरद पवार गटाचे नेते सुनील वऱ्हाडे म्हणाले की, "मी माझ्या घरी बसलेलो आहे आणि पक्षाशी निष्ठावंत आहे. मी पक्षाबरोबर कुठेच गडबड केली नसून. ज्यापद्धतीने त्यांनी चिल्लरपणा चालवला आहे तो त्यांच्या फायद्याचा आहे की, नुकसानीचा याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे." असे ते म्हणाले.