नवनीत राणांच्या सभेत 'अल्लाहू अकबर'चे नारे!

17 Nov 2024 13:53:30
 
Navneet Rana
 
अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत शनिवार, १७ नोव्हेंबर रोजी मोठा राडा झाला असून अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. दर्यापूर येथील खल्लार गावात त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या कार्यक्रमात काही लोकांनी खुर्च्या फेकत नवनीत राणांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
याबद्दल बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, "आम्ही शांततेत सभा घेत होतो. माझ्या सभेत काल २०० ते २५० लोक बसले होते. माझे भाषण सुरु असताना काही लोक लांबून ओरडत होते. अल्लाहू अकबर असे नारे ते देत होते. तसेच माझ्याबद्दल चुकीच्या शब्दात बोलत होते. तरीसुद्धा आम्ही शांत होतो. त्यानंतर सभा झाल्यावर मी सर्वांना भेटत होते. त्यावेळी 'तुझे मार देंगे, तुझे काट देंगे, हम अल्ला के लोग है,' असे काही लोक बोलत होते. मी त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर लगेच त्यांनी खुर्च्या उललल्या आणि आमच्या लोकांवर त्या फेकल्या. तसेच माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्नही केले. माझ्या सहा अंगरक्षकांनी माझा बचाव केला. यातील अनेक खुर्च्या माझ्या अंगरक्षकांना लागल्या."
 
हे वाचलंत का? - "...तर हा महाराष्ट्र १०-२० वर्षे मागे गेला असता!" मुख्यमंत्री शिंदेंची टीका
 
"या सगळ्या प्रकारातून एकच स्पष्ट होतंय की, जो व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढतोय त्याने लढू नये, असे त्यांना वाटते. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माननारे लोक असून ते विचार घेऊनच मी मैदानात उतरली आहे. त्यांची कापण्याची भाषा असेल तर आमचीसुद्धा तिच भाषा असेल. आम्ही शांत बसणार नाही," असे त्या म्हणाल्या.
 
उद्धव ठाकरे आता जनाब उद्धव ठाकरे झालेत!
 
नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, "उद्धव ठाकरेंच्या तालुक्याध्यक्षांचे ते गाव आहे. आम्ही सभेची तयारी सुरु केल्यानंतर तिथल्या सरपंचाने व्यासपीठावरून गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांच्या सुचनेनुसार आम्ही आमचा स्टेज तयार केला. त्यानंतर मला पोहोचायला उशीर झाल्याने ते तिथल्या महिलांना अपशब्द बोलत होते. आज उद्धव ठाकरे हे जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत. कालच्या प्रकारातून ते स्पष्ट झाले आहे. परंतू, आम्हीसुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहोत हे ते विसरले. बाळासाहेब ठाकरे मंचावरून पाकिस्तानला थेट उत्तर देत होते. मीसुद्धा त्यांचीच मुलगी म्हणून त्यांचे विचार घेऊन मैदानात आहे," असेही त्या म्हणाल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0