मुंबई : उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता. अडीच वर्षे घरात बसून सगळ्या कामांना स्थगिती देणारे आणि विकासकामे बंद पाडणारे सरकार आणखी काही काळ राहिले असते तर हा महाराष्ट्र १०-२० वर्षे मागे गेला असता, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज सगळी निवडणूकीची धामधूम सुरु आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे घेऊन जात आहोत. गेल्या दोन वर्षात बाळासाहेबांचे विचार आम्ही घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना हवा असलेला विकास, कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मनातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. या दोन, सव्वादोन वर्षात बंद पडलेले प्रकल्प सुरु करून आम्ही ते पुढे नेऊ शकलो, याचे समाधान आहे."
"विकास आणि कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घालू शकलो. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता, सरकार स्थापन होताच आम्ही तो पहिल्या क्रमांकावर आणला, याचेही समाधान आहे. पुढची पाच वर्षे महायूती सरकारला पुन्हा मिळतील आणि सरकार या राज्याचा सर्वांगिण विकास करेल. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता. अडीच वर्षे घरात बसून सगळ्या कामांना स्थगिती देणारे आणि विकासकामे बंद पाडणारे सरकार आणखी काही काळ राहिले असते तर हा महाराष्ट्र १०-२० वर्षे मागे गेला असता."