नाशिक : लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला लगावला आहे. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी चांदवड येथील भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना सुरु केली. पण काल परवा एक लबाडाचे आवतण आले. काँग्रेसचे सरकार आल्यावर सात हजार रुपये भाव देणार, असे मेसेज काही लोकांना आले. त्यानंतर कर्नाटकमध्ये फोन लावला आणि सोयाबिनचा भाव विचारला तर सरासरी तिथे ३८०० भाव आहे. इथे ते ७ हजार भाव देऊ असे सांगतात. त्यामुळे लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही. परंतू, आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही ६ हजार रुपये भाव देणार म्हणजे देणारच," असे आश्वासन त्यांनी दिले.
हे वाचलंत का? - मलबार हिल विधानसभेचे उमेदवार मंगल प्रभात लोढांची भव्य रॅली!
मविआ सरकारने फाईलवरची धुळही झटकली नाही!
"महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प करण्याचा विषय हातात घेतला. गुजरात आणि आपल्यामध्ये पाण्यासाठी वाद होतात. त्याकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातसोबत एक करार केला. त्यात गुजरातला किती पाणी आणि आपल्याला किती याचा एक निर्णय केला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कराराप्रमाणे पुढे जात होतो आणि अचानक नाशिक जिल्ह्यातून आमचे पाणी देताय अशी ओरड सुरु झाली. ज्या काँग्रेस सरकारने करार केला तेदेखील तसेच म्हणू लागले. त्यानंतर मी सगळे समजून घेतले आणि माझ्या लक्षात आले की, केंद्र सरकारचे पैसे केवळ आंतरराज्यीय प्रकल्पांना मिळतात. त्यामुळे कराराप्रमाणे गुजरातला पाणी द्यावे लागेल. परंतू, महाराष्ट्र काही लेचंपेचं राज्य नाही. हे मजबूत राज्य आहे आणि आम्हाला कोणाचेही पैसे नको. आम्ही आमच्या पैशाने हा प्रकल्प राबवू, असे मी सांगितले आणि हा करार तोडून टाकला."
"२०१९ ला मी सगळ्या प्रकल्पांना मान्यता दिली. परंतू, त्यानंतर दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांनी या फाईलवरची धुळसुद्धा झटकली नाही. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आपले सरकार आले आणि मी नार-पार गिरणा योजनेचे टेंडर काढले. पुढच्या तीन महिन्यात आपण त्याचे काम करणार आहोत. पार गोदावरीचे कामही मी अंतिम टप्प्यात आणले असून पुढच्या सहा महिन्यात पार गोदावरीचे टेंडर काढेल. या भागाला पूर्णपणे पाणीदार करण्याचे काम महायूतीचे सरकार करेल," असे आश्वासनही त्यांनी दिले.