सकल ब्राह्मण समाजाचा रविंद्र चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

    16-Nov-2024
Total Views |
Ravindra Chavan

डोंबिवली : “आपल्या भारत देशाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या थोर व्यक्तींचा इतिहास लाभला असून या दोन्ही ब्राह्मण तज्ज्ञ मंडळींना भारतरत्न मिळायला हवे. पण, त्यासाठी हिंदुत्व विचारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून हिंदुत्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्यांना आवर्जून मतदान करणे गरजेचे” असल्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, प्रखर हिंदुत्ववादी नेते सुनील देवधर यांनी केले. त्यानुसार ब्राह्मण सभेत जमलेल्या हजारो ब्राह्मण मंडळींनी चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा सामुहिक निर्णय घेतला.

ब्राह्मण सभेत संपन्न झालेल्या सकल ब्राह्मण समाज मेळाव्यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. भाजपलाच का मतदान द्यावे, याची अनेक उदाहरणे देवधर यांनी दिली. अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस यांनी त्यांचे मौलिक विचार मांडले. तसेच पंतप्रधान मोदीच का, या त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या १०१ कारणांपैकी काहींचा उल्लेख करून त्यांनी हिंदुत्व पटवून दिले.

मंत्री चव्हाण यांनी शहरातील अपप्रवृत्ती कशा वाढल्या होत्या, त्या समूळ नष्ट करायला किती वेळ गेला, याबाबत उदाहरण देऊन माध्यमांनी जे लिहायला हवे ते परखड शब्दांत विचार मांडले. “शहरातील सर्व ब्राह्मण ज्ञाती समाजाचे पदाधिकार्‍यांचे मला सातत्याने मार्गदर्शन मिळते, त्यांचा मी ऋणी आहे,” असे ते म्हणाले.

त्यावेळी माधव घुले, प्रदीप जोशी, जे. के. जोशी, मनीषा धोपटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव जोशी, पद्माकर कुलकर्णी, जय कृष्णसप्तर्षी, श्री गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष अलका मुतालिक, अ‍ॅड. वृंदा कुलकर्णी, ब्राह्मण सभा अध्यक्ष राहुल दामले, संदीप पुराणिक, प्रज्ञेश प्रभुघाटे, मानस पिंगळे, मधुकर कुलकर्णी, शशांक खैर, अमरेंद्र पटवर्धन, गौरी खुंटे, शमा भाट्ये, यांसह हजारो ब्राह्मण मंडळी उपस्थित होती.